– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणूस पडद्यावर दृश्ये पाहतो त्यांचा परिणामही शरीर मनावर होतो.कारण पडद्यावरील दृश्ये हे कल्पनादर्शनच असते. त्यामुळे प्रत्यक्ष आयुष्यात फारसे आघात झालेले नसताना देखील सतत हॉरर शो आणि वादळे,भूकंप,हत्या यांचे व्हीडिओ पाहिले तर आघातजन्य तणावाची लक्षणे दिसू शकतात. भीतीदायक स्वप्ने पडतात, जागेपणीही भीतीचा झटका येतो. लैंगिक दृश्ये असलेले व्हीडिओ पुन:पुन्हा पाहिले तर तेच विचार पुन:पुन्हा येतात, तशी दृश्ये दिसतात. लिंबाचा रस तोंडात पिळतो आहे असे कल्पनादर्शन केले तर तोंडात लालास्त्राव होतो, तसाच पोर्न पाहताना पडद्यावरील दृश्यांनी शरीरात कामसुखाच्या संवेदना होतात. या संवेदना सुखद असल्याने पुन:पुन्हा ती दृश्ये पाहावी असे वाटते. त्यामुळे वास्तव आयुष्यात लक्ष राहात नाही, कार्यक्षमतेवर दुष्परिणाम होतात. जे वारंवार पाहिले जाते त्याविषयीची संवेदनशीलता कमी होते. त्यामुळे सुखद संवेदना येण्यासाठी अधिकाधिक बीभत्स, अनैसर्गिक व्हीडिओ शोधले जातात. जे पाहिले ते प्रत्यक्ष करावे असे वाटू लागते आणि त्याचे दुष्परिणाम लहान मुलांना भोगावेलागतात. पोर्नमध्ये दिसते ते खरे असते असे वाटल्याने वैवाहिक आयुष्यातदेखील समस्या निर्माण होतात. हे सारे टाळायचे असेल तर पडद्यावर आणि कल्पनेत देखील काय पाहायचे आणि काय टाळायचे याचा विवेक ठेवायला हवा. अशा फिल्मना खूप मागणी असल्याने हा मोठ्ठा व्यवसाय झाला आहे, हे वास्तव नाकारून चालणार नाही. त्यामुळे मुलांना त्यांच्या शरीराला होणारा असा घाणेरडा स्पर्श ओळखता यावा याचे शिक्षण शाळांमध्ये दिले जाऊ लागले आहे, ते गरजेचे आहे. या विषयावर मुलांशी देखील योग्य प्रकारे बोलायला हवे. लैंगिक आकर्षण ही सजीवाची नैसर्गिक प्रेरणा आहे. तिला योग्य प्रकारे सामोरे जायला हवे. त्या विचारांना पापी, घाणेरडे असे लेबल न लावता त्यांची नोंद करायला हवी. पण कोणतीही कृती करताना विवेक बाळगायला हवा. कल्पनादर्शन करताना देखील असा विवेक आवश्यक आहे. याच साठी सर्व जण भद्र म्हणजे चांगल्या, पवित्र कल्पना करोत ‘सर्वे भद्राणि पश्यन्तु’ अशी प्रार्थना केली जाते. स्क्रीन वरील प्रतिमादृश्ये प्रभावी असतात, ती पाहण्यात किती वेळ गेला याचेही भान राहत नाही. म्हणून फोनवर, टीव्ही वर काय पाहायचे व  किती वेळ पाहायचे हे निश्चित ठरवायला हवे.

yashwel@gmail.com