– डॉ. यश वेलणकर
माणसाच्या मेंदूत दुसऱ्या माणसाच्या वेदनेने सक्रिय होणारा आणि त्यामुळे स्वत:च्या शरीरात वेदना निर्माण करणारा भाग आहे. त्यामुळेच आपल्याला समानुभूतीचा (एम्पथी) अनुभव येतो. असे असूनही माणसे मोठय़ा प्रमाणात नरसंहार कसा करू शकतात; त्या वेळी त्यांना वेदना जाणवत नाहीत का, असा प्रश्न मेंदू-संशोधकांना होता. मात्र, अनेक वर्षे एकमेकांशेजारी राहणारी माणसे परस्परांच्या जिवावर कशी उठतात, याचे कोडे आता उलगडले आहे. आपल्या मेंदूत ‘मेडियल प्रीफ्रण्टल कॉर्टेक्स’मध्ये एक भाग असा आहे की, जो दुसऱ्या माणसाला पाहिल्यावर सक्रिय होतो. दुसऱ्या माणसाला वेदना होत आहेत हे जाणवले, की याच भागामुळे आपल्या शरीरातही वेदना होतात. परंतु हा भाग कोणतीही निर्जीव वस्तू- उदा. टेबल, कपबशी- पाहिली तर सक्रिय होत नाही. मेंदू-संशोधकांना नंतर असे आढळले की, हा भाग सर्वच माणसांना पाहून सक्रिय होत नाही. त्या व्यक्तीला ज्यांच्याविषयी आपलेपणा वाटतो, ती माणसे पाहिली तरच तो सक्रिय होतो. म्हणजेच माझ्या समूहातील व समूहाबाहेरील माणसाविषयी माझ्या मेंदूतील सुप्त प्रतिक्रिया वेगवेगळी असते. हे केवळ आर्थिक स्थितीतील फरकावरूनच होत नाही; तर उपासना पद्धतीतील आणि तत्त्वज्ञानातील भेदामुळेही होते. हे तपासण्यासाठी शास्त्रज्ञांनी एक प्रयोग केला. विविध धर्माच्या आणि नास्तिक व्यक्तींनाही त्यांनी प्रयोगात समाविष्ट केले. त्यांच्या समोरील संगणकाच्या पडद्यावर माणसाचे छायाचित्र आणि त्यावर हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन, ज्यू किंवा नास्तिक अशी लेबले लावली. वेगवेगळ्या क्रमाने ही छायाचित्रे दाखवून, त्या वेळी मेंदूत काय घडते ते पाहिले. तेव्हा आपल्यापेक्षा वेगळ्या गटातील माणूस पाहिला असता ‘मेडियल प्रीफ्रण्टल कॉर्टेक्स’मधील हा भाग सक्रिय होत नाही असे दिसून आले. हे धार्मिक व्यक्तींच्या मेंदूत झाले, तसेच नास्तिक व्यक्तींच्या मेंदूतही झाले. माणसांचा त्यांच्या तत्त्वज्ञानाचा आग्रह जेवढा अधिक, तेवढी मेंदूतील प्रतिक्रियाही अधिक स्पष्ट होती. ‘आम्ही आणि अन्य’ हा भेद मेंदूत संस्कारांनी कोरला जातो आणि त्यानुसार तो जागृत मनाला समजण्यापूर्वीच प्रतिक्रिया करतो हे यावरून स्पष्ट झाले.
अशी कट्टरता कमी करून सहिष्णुता वाढवायची असेल, तर तसे संस्कार आणि करुणा ध्यान यांचा उपयोग होऊ शकतो, हेही मेंदूतज्ज्ञ मान्य करू लागले आहेत.
yashwel@gmail.com