– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही माणसे विचारांची गुलाम होतात. विचार हुकूम सोडतात आणि तशी कृती करण्याचे माणूस टाळू शकत नाही. हे कमी करायचे असेल तर विचार आणि कृती यांमध्ये फरक आहे याचे भान वाढवणे आवश्यक असते. ‘ओसीडी’ (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसऑर्डर) आणि व्यसनाधीनता यांमध्ये हे भान नसते. त्यासाठी विचार मनात आला, ‘आता एक सिगारेट ओढू या’ तरी- ‘हा केवळ विचार आहे; त्याचा हुकूम मानणार नाही’ असा निर्धार करणे महत्त्वाचे असते. विचारांची गुलामी झटकण्याचा आणखी एक उपाय म्हणजे त्या विचाराची चेष्टा करायची, त्याचे महत्त्व कमी करायचे. माझ्या हाताला जंतू लागले असतील हा विचार मनात पुन:पुन्हा येत असेल, ठाण मांडून बसला असेल, तो चुकीचा आहे हे मनाला पटत असूनदेखील तो अस्वस्थ करीत असेल तर त्या विचाराला एखाद्या गाण्याची चाल लावायची. उदाहरणार्थ, ‘माझ्या हाताला लागली घाण’ हे वाक्य ‘वर ढगाला लागली कळ’ या चालीत म्हणायचे, पुन:पुन्हा म्हणायचे. हा उपाय निव्वळ गमतीचा वाटेल, पण तो खूप परिणामकारक आहे. असे केल्याने आपण त्या विचाराचे गांभीर्य काढून टाकतो. त्यामुळे त्याची शक्ती कमी होते, त्या विचारामुळे आपल्यावर जी सक्ती होत असते, ती राहात नाही. त्या विचारामुळे येणारी अस्वस्थता कमी होते. आपण स्वतंत्र होतो. मुक्त होतो. मानसशास्त्रात या तंत्राला ‘डी-फ्यूज’ म्हणतात. विचार आपल्याशी जोडला गेलेला असतो; ही जोडणी तोडायची. विचाराला नाकारायचे नाही, त्याला बदलण्याचाही प्रयत्न करायचा नाही. कारण असे प्रयत्न फारसे यशस्वी होत नाहीत.

यापुढली पायरी म्हणजे वेगवेगळे विचार येतील आणि जातील; ते कसे बदलत आहेत हे तटस्थपणे पाहायचे. बाराव्या शतकातील सुफी संत रूमी हे एका कवितेत म्हणतात की, ‘धर्मशाळेत जसे वेगवेगळे प्रवासी येतात आणि जातात.. काही लगेच जातात, काही अधिक काळ थांबतात, पण धर्मशाळेत कायमचे कुणीच राहात नाही’

विचारांबाबत, रूमी यांच्यासारखा अनुभव आपण सजगतेने घेऊ शकतो. मग आपणही म्हणू शकतो की, ‘मी विचारांना पाहातो, पण त्यांना माझा ताबा घेऊ देत नाही.’ त्यातील एखादा पाहुणा आक्रमक होऊन मालकी हक्क दाखवू लागलाच तर त्याची चेष्टा करायची, त्याचा हुकूम मानायचा नाही.

yashwel@gmail.com