– डॉ. यश वेलणकर

योग आणि भारतीय मानसशास्त्रानुसार मनाच्या साऱ्या क्रिया हा सत्त्व, रज आणि तम यांचा खेळ असतो. जागृतावस्थेत उत्साह आणि आनंद वाटतो त्या वेळी सत्त्वगुण प्रबळ असतो. रजोगुण प्रबळ असेल त्या वेळी कामाचा उत्साह असतो पण आनंद नसतो. नंतर होणाऱ्या लाभावर नजर ठेवून काम केले जाते; पण लाभ होईलच याची खात्री नसल्याने तणाव असतो. रजोगुणाची शक्ती अधिक असते त्या वेळी माणूस शांत बसू शकत नाही, सतत हालचाल करीत राहतो. कर्तेपणाचा अहंकार अधिक असतो. स्वत:च्या लाभासाठी तो नैतिकतेची पर्वा करीत नाही, पण त्यामुळे त्याला चिंता अधिक असते. अशा माणसाच्या मनात एकाच वेळी अनेक उपक्रम योजले जात असतात. याउलट तमोगुण वाढतो त्या वेळी मन बधिर होते, आकलनशक्ती कमी होते. कंटाळा येतो, उदासी वाटते, कोठे मन रमत नाही. सत्त्वावजय चिकित्सा म्हणजे रज आणि तम यांची शक्ती कमी करून सत्त्वगुणाची शक्ती वाढवायची. साक्षीभावाच्या सरावाने सत्त्वगुण वाढतो. अर्थात, दिवसरात्रीत निसर्गत: सत्त्व, रज आणि तम यांचे प्रमाण कमीजास्त होत राहते. सकाळी सत्त्वगुण वाढतो, त्यामुळे झोपेतून जाग येते. मात्र त्याचे बळ कमी असेल तर सकाळीदेखील उदासी कायम राहते, अंथरुणातून बाहेर पडावे असे वाटत नाही. अशा वेळी तमोगुण कमी करणारे उपचार केले तर औदासीन्य कमी होते. दिवसभरात रजोगुण वाढला तर कर्तेपणाने कामे होतात. त्याला सत्त्वगुणाची जोड असेल तर कामाचा तणाव न येता आनंद वाटतो. संध्याकाळी रजोगुण कमी होऊन तमोगुण निसर्गत: वाढू लागतो. तो वाढला तरच रात्री झोप लागते. या तमोगुणाला सत्त्वगुणाची जोड असेल तर झोप शांत आणि आरोग्यदायी असते. झोपेतही रजोगुण वाढतो त्या वेळी स्वप्ने पडतात. मात्र रजोगुणाचे प्राबल्य अधिक राहिले तर गाढ झोप लागत नाही. झोपेत भीतीदायक स्वप्ने पडतात हे विकृत रजोगुणाचे लक्षण आहे. रात्री शांत झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वीचा काही वेळ उत्तेजित करणारे कार्यक्रम पाहणे, चहा-कॉफी अशी उत्तेजित करणारी पेये टाळायला हवीत. शारीरिक व्यायामदेखील रजोगुण वाढवतो त्यामुळे तोही झोपायला जाण्यापूर्वी किमान तीन तास करायचा नाही. झोपायला जाण्यापूर्वी अर्धा तास मंद प्रकाशात ध्यान केले, त्यानंतर अंथरुणावर पडून स्नायू शिथिलीकरण केले की रजोगुणाने वाढणारा मानसिक तणाव कमी होतो व शांत झोप लागते.

yashwel@gmail.com