– डॉ. यश वेलणकर
झोप अनेक आजारांवरील औषध असले तरी झोपेचेदेखील अनेक आजार असतात. जागे झाल्यानंतरही हालचाल करता न येणे, स्लीप पॅरॅलिसिस असा त्रास काहींना होतो. स्वप्न अवस्थेत स्नायू पूर्णत: शिथिल झालेले असतात. जाग आली की स्नायूंचा टोन वाढतो आणि ते हलवता येतात. मात्र काही वेळा स्वप्नावस्थेत असतानाच जाग आली तर स्नायू तसेच पूर्णत: शिथिल राहतात, त्यामुळे ते हलवताच येत नाहीत. अर्धवट स्वप्नावस्था असेल तर या वेळी भासही होतात. असे का होत आहे हे न कळल्याने माणूस घाबरतो. मात्र काही वेळ तसेच शांतपणे पडून राहिल्यानंतर मेंदू आपली चूक सुधारतो, स्नायूंमध्ये शक्ती येते आणि त्यांची हालचाल करता येते. मेंदूचा असाच गोंधळ उलटय़ा प्रकारेही होतो. त्या वेळी स्वप्ने पडू लागतात पण स्नायू पूर्ण शिथिल होत नाहीत. त्यामुळे स्वप्नात मारामारी करणाऱ्या माणसाचे हातपाय प्रत्यक्षातदेखील हलतात आणि त्याचा शेजारी झोपलेल्याला त्रास होतो. मानसिक तणावामुळे मेंदूचा असा गोंधळ होऊ शकतो. काही जणांना गाढ झोप आणि स्वप्न अवस्थेची झोप ही स्थिती बदलताना दचकून जाग येते. गाडीचा चालक नवीन असेल तर गिअर बदलताना गाडी खडखड करते तसे होते. सलग झोप न झाल्याने पुरेशी विश्रांती मिळत नाही. हा त्रास शारीरिक व्यायाम केला की कमी होतो. झोपेत पायांची हालचाल करण्यासाठी जाग येणे, रेस्टलेस लेग सिंड्रोम असा त्रास असेल तरीही झोप पूर्ण होत नाही. झोपेत पायात त्रासदायक संवेदना जाणवू लागतात, झिणझिण्या, मुंग्या येतात, खाज उठते, गोळा येतो आणि पाय हलवले की त्या कमी होतात. या संवेदनांमुळे जाग येते. असा त्रास वय वाढते तसा वाढू शकतो. अशा वेळी मधुमेह, अॅनिमिया असा शारीरिक आजार आहे का हे तपासून घेणे आवश्यक असते. तसा आजार नसेल तर हेही तणावाचे लक्षण असू शकते. नार्कोलेप्सी हा तारुण्यावस्थेत होणारा त्रास आहे. दिवसा वारंवार झोप लागणे, काही वेळा झोपेत पडणे, झोप लागण्यापूर्वी जी दृश्ये दिसतात ती खरी आहेत असे वाटणे ही याची लक्षणे आहेत. मेंदूतील सेरेटोनीन रसायन वाढवणारी औषधे घेतल्याने हा त्रास कमी होतो. त्यामुळे हा डिप्रेशनशी संबंधित त्रास असावा असे शास्त्रज्ञांना वाटते. आपल्या समाजात अशा त्रासांना गांभीर्याने घेतले जात नाही, त्यांची चेष्टा होते पण त्यामुळे स्वास्थ्य धोक्यात येऊ शकते.
yashwel@gmail.com