– सुनीत पोतनीस
स्थानिक सुलतानांशी निरनिराळे करार करून मध्य व दक्षिण सोमालियावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यावर इटलीच्या संसदेने १९०८ साली या सर्व राज्यक्षेत्रांचे एकत्रीकरण करून त्यास ‘सोमालिया इटालियाना’ असे नाव दिले. पुढे पहिल्या महायुद्धात इटलीच्या फौजा दोस्त राष्ट्रांच्या आघाडीतून लढल्या आणि त्याचे बक्षीस म्हणून ब्रिटिशांनी त्यांच्या ‘ब्रिटिश सोमालीलॅण्ड’चा काही प्रदेश १९२५ मध्ये इटलीला भेट दिला. पुढच्या काळात या वसाहतीत शेकडो इटालियन कुटुंबे स्थलांतरित होऊन या प्रदेशाचे नाव ‘इटालियन सोमालीलॅण्ड’ झाले. मोगादिशु हे या वसाहतीचे राजधानीचे शहर झाले. मोगादिशु हे इटालियनांचे एक महत्त्वाचे नौदल-ठाणे बनले आणि तत्कालीन पंतप्रधान बेनिटो मुसोलिनीने ‘इटालियन सोमालीलॅण्ड’ला आफ्रिका खंडातल्या इटालियन वसाहतींपैकी प्रमुख वसाहतीचा दर्जा दिला. १९३० साली ‘इटालियन सोमालीलॅण्ड’मध्ये २२ हजार इटालियन स्थायिक झालेले होते. १९३५ मध्ये फॅसिस्ट मुसोलिनीच्या लष्कराने शेजारच्या इथिओपियावर आक्रमण करून तो प्रदेशही वसाहतीत समाविष्ट केला.
इथिओपियाचे युद्ध संपल्यावर, १९३६ साली इटलीने त्यांच्या सोमालीलॅण्ड वसाहतीत नुकत्याच कब्जा केलेल्या इथिओपिया व इरिट्रियाचा समावेश केला. मोगादिशु येथे या विजयानिमित्त भव्य कमान उभारण्यात आली. पुढेही इटलीच्या फॅसिस्ट सरकारने इथिओपियामार्गे ‘ब्रिटिश सोमालीलँड’वर १९४० मध्ये चढाई करून त्यातील काही प्रदेश ताब्यात घेतला. प्रत्युत्तर म्हणून ब्रिटनने केनियामार्गे ‘इटालियन सोमालीलॅण्ड’वर प्रखर हल्ला करून आपल्या ताब्यातून गेलेला प्रदेश तर मिळवलाच, परंतु इटालियन प्रदेशाचाही निम्माअधिक भाग कब्जात घेतला. दुसऱ्या महायुद्धात इटली पराभूत आघाडीत होता. या काळात १९४५ पर्यंत ब्रिटिश व इटालियन या दोन्ही सोमालीलॅण्डचा ताबा ब्रिटनकडे होता. १९५० साली सोमालियातील अस्थिर राजकीय परिस्थितीत संयुक्त राष्ट्र संघटनेने ‘इटालियन सोमालीलॅण्ड’चे पालकत्व स्वत:कडे घेऊन इटलीकडे तिथले स्वायत्त प्रशासन सोपवले. यामुळे प्रशासन इटलीकडेच राहिले, पण नाव ‘इटालियन सोमालीलॅण्ड’ऐवजी ‘सोमालीलॅण्ड’ झाले.
sunitpotnis94@gmail.com