– डॉ. यश वेलणकर

बायपोलर डिसऑर्डर हा मानसिक विकार आहे. असा आजार नसेल तरीही निरोगी माणसात उत्तेजित आणि उदास अशा मनाच्या अवस्था कधी ना कधी येत असतात. योगशास्त्रामध्ये मनाच्या पाच अवस्था सांगितल्या आहेत : क्षिप्त, मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरुद्ध अशी त्यांची नावे आहेत. मूढ आणि क्षिप्त या उदास आणि उत्तेजितसदृश अवस्था आहेत. मूढ स्थितीत बधिरता असते, कोणतीच जाणीव नसते. झोप आलेली असताना अशी स्थिती येणे स्वाभाविक आहे. पण अशी स्थिती अधिक वेळ राहत असेल तर योगशास्त्रानुसार ते तमोगुण वाढल्याचे लक्षण आहे. योग हे चिकित्साशास्त्र नाही, तो कैवल्याचा मार्ग आहे. आयुर्वेद हे चिकित्साशास्त्र आहे. त्यामुळेच आयुर्वेदातील सत्त्वावजय चिकित्सेत योगातील संकल्पना आणि तंत्रे यांचा उपयोग शारीरिक, मानसिक त्रास कमी करण्यासाठी करून घेतला जातो. औदासीन्य असताना अशी मूढ स्थिती अधिक वेळ असते. क्षिप्त अवस्थेत विचार खूप वेगाने बदलत असतात आणि त्यामध्ये सुसूत्रता नसते. मन खूप चंचल आणि अस्वस्थ असते. निरोगी व्यक्तीदेखील चिंता असेल त्या वेळी या स्थितीत असू शकते. पण अशी स्थिती अधिक काळ असेल तर ते विकृतीचे लक्षण आहे. सत्त्व गुणाचा पूर्ण लोप झाल्याने ही स्थिती अधिक वेळ राहते. अशा विकृतीमध्ये आत्मभान नसेल तर सत्त्वावजय चिकित्सा उपयोगी होत नाही. या चिकित्सेत स्वेच्छेने स्वत:चे लक्ष आपल्याला हवे त्या ठिकाणी नेता येणे ही क्षमता आवश्यक आहे. ती वापरली की क्षिप्त, मूढ या स्थितीतून बाहेर पडता येते. योगातील तिसऱ्या स्थितीला विक्षिप्त असे नाव आहे. मराठीत विक्षिप्त शब्दाचा अर्थ विचित्र वागणे असा होतो; तो अर्थ योगात अपेक्षित नाही. मन विचारात आहे पण उदासी किंवा चिंता नाही, अशी ही स्थिती आहे. अधिकाधिक माणसे याच स्थितीत अधिक वेळ असतात. आयुर्वेदानुसार आरोग्यामध्ये प्रसन्नता अपेक्षित असते. शरीर आणि मनाकडे साक्षीभाव ठेवून पाहणे शक्य झाले की प्रसन्नतेचा अनुभव येतो. यालाच योगात विवेकख्याती म्हणतात. मी शरीरमन नाही याचे भान म्हणजे विवेकख्याती होय. साक्षीभावाच्या सरावाने माणसाचे व्यक्तिमत्त्व बदलते. तो काही वेळ एकाग्र स्थितीत राहू शकतो. योगातील निरुद्ध स्थिती म्हणजे चित्तवृत्तींचा निरोध झाला आहे अशी अमन स्थिती होय. योगाचे हेच उद्दिष्ट आहे. सामान्य माणसाच्या जागृतावस्थेत निरुद्ध स्थिती सहसा असत नाही, अन्य चार स्थिती असतात.

yashwel@gmail.com