डॉ. यश वेलणकर

तणावाचा शरीरावर परिणाम होतो, हे आधुनिक काळात डॉ. हान्स सेल्ये यांनी सर्वप्रथम दाखवून दिले. ते वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच त्यांना लक्षात आले की, कर्करोग, क्षय अशा अनेक जुनाट आजारांत तणावसदृश लक्षणे समान असतात. नंतर पीएच.डी. करताना त्यांनी प्राण्यांवर प्रयोग सुरू केले. उंदरांवर थंडगार पाणी ओतणे, सुयांनी टोचणे असा त्रास दिला तर त्यांच्या प्रतिक्रिया तीन टप्प्यांत असतात. प्रथम संकटापासून बचाव करण्यासाठी शरीरात युद्धस्थिती निर्माण होते. याला त्यांनी ‘अलार्म स्टेज’ म्हटले. संकट कायम राहिले तर युद्धस्थितीतील रसायने बदलत जातात, शरीर तणावाचा प्रतिकार करत राहते. या स्थितीला त्यांनी ‘रेझिस्टन्स’ म्हटले. तिसऱ्या स्थितीत शरीराची प्रतिकार क्षमता संपते. युद्धस्थितीतील रसायनांच्या परिणामी शरीरात अनेक विकृती निर्माण होतात व उंदराचा अकाली मृत्यू होतो. यास त्यांनी ‘एक्झॉशन’ म्हटले.

या तीन टप्प्यांत शरीरात जे काही घडते, त्याला डॉ. सेल्ये यांनी ‘स्ट्रेस’ हा शब्द सर्वात प्रथम वापरला. शारीरिक त्रास नसतानाही संकटाच्या विचारांनी माणूस अशाच स्थितीतून जातो. या विषयाच्या जागृतीसाठी त्यांनी ‘द स्ट्रेस ऑफ लाइफ’ (१९५६) आणि ‘स्ट्रेस विदाऊट डीस्ट्रेस’ (१९७४) ही पुस्तके लिहिली. त्यांनीच ‘युस्ट्रेस’ म्हणजे चांगला तणाव आणि ‘डीस्ट्रेस’ म्हणजे त्रासदायक तणाव या संकल्पना स्पष्ट केल्या. माणसाला स्वत:च्या क्षमता विकसित करण्यासाठी प्रेरणा देणारा तणाव असायला हवा. मात्र तो वाढला की त्रासदायक होतो. हा ‘स्ट्रेस’ शारीरिक किंवा मानसिक आघातानंतर बराच काळ राहतो, हे व्हिएतनाम युद्धानंतर लक्षात आले. त्यानंतर १९८० मध्ये मानसरोगांच्या यादीत ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसॉर्डर’ (आघातोत्तर तणाव) या आजाराचा समावेश झाला. सततच्या तणावामुळे रक्तदाब वाढतो, रक्तवाहिन्या खराब होतात, त्यामुळे हृदय थकते, अर्धागवायू होऊ शकतो, मूत्रपिंडे खराब होतात, हे विविध संशोधनांत दिसू लागले. याविषयी ‘सायकोन्युरोकार्डिओलॉजी’ या स्वतंत्र शाखेत संशोधन केले जाते. तणावाचा परिणाम स्प्लीन, बोन मॅरो व संपूर्ण रोगप्रतिकारक शक्तीवर होतो, हे सिद्ध झाले आहे. याचा अभ्यास ‘सायकोन्युरोइम्युनोलॉजी’मध्ये केला जातो. तणाव कमी करण्यासाठी ‘अटेन्शन ट्रेनिंग’ उपयुक्त आहे, हेच या अभ्यासांत दिसत आहे.

yashwel@gmail.com