व्यक्तिमत्व विकासासाठी स्वत:ची कौशल्ये विकसित करावी लागतात त्याच बरोबर काही वैगुण्ये असतील तर ती दूर करावी लागतात. तोतरे बोलणे हे असेच एक वैगुण्य आहे. बोबडे आणि तोतरे हे दोन्ही वाणीतील दोष आहेत. बोबडे बोलणारी व्यक्ती र, क अशा काही अक्षरांचा उच्चार ल, त असा करतात. तोतरे बोलणारी व्यक्ती उच्चार योग्य करते पण बोलताना अडखळते, शब्द पूर्ण न होता मध्येच थांबायला होते. लहानपणी बरीच मुले तोतरी असतात, वय वाढते तसे हा त्रास कमी होतो. एक टक्का प्रौढ तोतरे असतात. तोतरेपणावर जगभर संशोधन सुरू असले तरी निश्चित कारण समजलेले नाही. मानसिक तणाव वा अस्वस्थता असेल तर तोतरेपणा वाढतो. त्यामुळे तो कमी करण्यासाठी तणाव कमी करण्याचे उपाय उचित ठरतात. पोट फुगवत श्वास घेणे आणि तो सावकाश सोडणे रोज पाच मिनिटे केल्याने फायदा होतो. त्याचबरोबर ध्यानाच्या विविध प्रकारांचा सराव उपयुक्त ठरतो. बोलताना श्वास घ्यायचा आणि तो सोडत बोलायचे. सलग बोलत न राहता श्वास संपला की बोलणे काही सेकंद थांबवून पुन्हा श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत बोलायला लागायचे. असे केल्याने तोतरेपणा कमी होतो. मात्र बोलताना हे शक्य होण्यासाठी सजगता आवश्यक असते, ध्यानाच्या सरावाने ती वाढते. बोलताना स्वराची पट्टी बदलत राहिल्याने अडखळणे कमी होते. मनात अस्वस्थता असेल त्या वेळी शरीरावर लक्ष नेऊन शरीरात जे काही जाणवते त्याचा स्वीकार करण्याचे ‘साक्षीध्यान’ भावनिक तणाव कमी करते.लक्ष वर्तमान क्षणात ठेवण्याचा सराव केला की नंतर बोलताना अडखळायला होईल या भीतीचा परिणाम कमी होतो. अडखळायला झाले तरी त्याबद्दल अपराधी वाटून न घेता त्याचा स्वीकार करून शरीरावर लक्ष न्यायचे. एखादे भाषण करायचे असेल किंवा मुलाखत द्यायची असेल त्यापूर्वी आपण सहज आणि सलग बोलत आहोत याचे ‘कल्पनादर्शन ध्यान’ वारंवार केले की प्रत्यक्ष बोलणे अधिक सहजतेने होते. ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल तसेच शास्त्रज्ञ डार्विन आधी तोतरे होते. पण ते त्यांच्या भाषणाची अशी मेंटल रिहर्सल अनेक वेळा करायचे. तोतरेपणा असलेल्या व्यक्तीने स्वप्रतिमा सुधारण्यासाठी स्वत:चा स्वीकार करण्याचे ‘करुणा ध्यान’ही रोज करायला हवे. सत्त्वावजय चिकित्सेतील ध्यानाचा सराव आणि समुपदेशन यांनी तोतरेपणा कमी होऊ शकतो.
डॉ. यश वेलणकर
yashwel@gmail.com