– डॉ. यश वेलणकर
शरीर आणि मन यांकडे साक्षीभाव ठेवून पाहण्याचे तंत्र अष्टांगयोगात, आयुर्वेदातील सत्त्वावाजय चिकित्सेत, बुद्धाच्या विपश्यनेत आणि जैनांच्या प्रेक्षाध्यानात सांगितले आहे, तसेच सुफी पंथातदेखील सांगितले आहे. तेराव्या शतकातील तुर्कस्थानमधील जलालुद्दीन रुमी यांची ‘गेस्ट हाऊस’ या (इंग्रजी भाषांतरित) शीर्षकाची प्रसिद्ध कविता आहे. त्यामध्ये ते लिहितात की, माणूस गेस्ट हाऊस किंवा धर्मशाळेसारखा आहे. तेथे रागीट, प्रेमळ, शोकाकुल, आनंदी अशी वेगवेगळी माणसे येतात आणि जातात. कुणीच तेथे कायमचे राहात नाही. मनातदेखील असे वेगवेगळे विचार आणि भावना येतात आणि जातात. या प्रत्येक पाहुण्याचे स्वागत करायला हवे, कुणालाच नाकारता कामा नये. मनातील विचार असे पाहुणे म्हणून पाहणे हेच साक्षीध्यान आहे.
सुफी गुरू शरीराकडे लक्ष देण्याची दोन तंत्रे शिकवीत असत. अल्लाह्चे स्मरण करीत श्वास घ्यायचा आणि ‘स्स्स’ असा आवाज करीत तो जोरात सोडायचा, असा प्राणायाम प्रथम करायचा. दुसरा प्रकार म्हणजे, एक हात जमिनीच्या दिशेने आणि दुसरा आकाशाकडे ठेवून स्वत:भोवती गिरक्या घेत एका लयीत नृत्य करायचे. त्यानंतर शांत बसून शरीर-मनात जे जाणवते त्याकडे लक्ष द्यायचे.
झेन पंथात अनेक कथा आहेत, तशाच सुफी पंथातही आहेत. एक कथा अशी.. एक माणूस पोहायला शिकण्याच्या उद्देशाने गुरूकडे जातो. त्याच्या डोक्यावर बरेच सामान असते. गुरू पोहायला शिकण्यासाठी त्याला पाण्यात बोलावतो आणि डोक्यावरचे सामान ठेवून द्यायला सांगतो. मात्र तो माणूस हे खूप किमतीचे सामान आहे, ते डोक्यावर घेऊनच मला पोहायला शिकवावे, असा आग्रह धरतो. सारांश : हाताने डोक्यावरचे सामान धरून पोहता येणार नाही. तसेच साक्षीभावाचा सराव करण्यासाठी डोक्यातील तत्त्वज्ञानाचे ओझे बाजूला ठेवावे लागेल. सध्याही बरीच माणसे साक्षीध्यानाचा प्रत्यक्ष सराव न करता योग, बौद्ध, जैन यांच्या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत गुंतलेली असतात. अशी प्रत्यक्ष सरावाला महत्त्व न देता बौद्धिक चर्चा करीत राहणारी माणसे सर्व प्रदेशांत पूर्वीपासूनच आहेत, हेच वरील सुफी कथा सुचवीत आहे. साक्षीध्यानाचा सराव करताना मनात येणाऱ्या सर्व विचारांकडे पाहुणे म्हणून पाहणे अपेक्षित आहे.
yashwel@gmail.com