– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विचार सर्व प्राण्यांच्या मनात येतात. मात्र आत्ता माझ्या मनात हा विचार आहे हे भान अन्य प्राण्यांना असत नाही. एखादी कृती कोणत्या उद्देशाने करीत आहोत असा विचारही अन्य प्राणी करू शकत नाहीत. अन्य प्राणी सामुदायिक कृती करतात, पक्ष्यांचा थवा एका दिशेने उडत जातो, माकडे टोळ्या करून राहतात. पण या सर्व कृती अंत:प्रेरणेने होतात. आपण हे का करीत आहोत असा विचार ते करत नाहीत. माणसाने तो करायला हवा. असा हेतूचा विचार करणे आणि तो हेतू दुसऱ्या माणसांना कळू देणे हेच माणसाचे वैशिष्टय़ आहे. आई आणि मुले वस्तू लपवून त्या शोधण्याचा खेळ खेळत असताना आईने एका दिशेने बोट दाखवले, तर ‘ती लपवून ठेवलेली वस्तू कुठे आहे हे सांगते आहे’ हे १४ महिन्यांचे बाळ ओळखू शकते. मात्र चिम्पान्झी किंवा दुसऱ्या कोणत्याही प्राण्याला तो कितीही मोठा झाला तरी हा बोट दाखवण्यामागील हेतू समजत नाही. ठरावीक दिशेने बोट दाखवले की ठरावीक कृती करायची याचे पुन:पुन्हा प्रशिक्षण दिले तरच प्राणी त्यानुसार वागू शकतात.

हे प्राण्यांविषयी खरे आहे, तसेच ‘रोबो’विषयीही असेल असे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विषयात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना वाटते. आता जीपीएसने आपण रस्ते शोधू शकतो, ज्या ठिकाणी प्रथमच जात आहोत तेथे कुणालाही पत्ता न विचारता जाऊ शकतो. तंत्रज्ञान खूप चांगल्या पद्धतीने माहिती देऊ शकते. पण तिथे ‘का’ जायचे आहे वा ‘तेथेच’ का जायचे, या प्रश्नांचे योग्य उत्तर तंत्रज्ञान देऊ शकणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता विश्वविजेत्या बुद्धिबळ खेळाडूला बुद्धिबळात मात देऊ शकते; कारण त्यामध्ये अनेक शक्यतांचा विचार आवश्यक असतो. संगणक ते अधिक चांगले करू शकतात.

कृत्रिम स्मरणशक्तीही मानवी स्मरणशक्तीच्या किती तरी पट अधिक आहे. नवीन रोबो स्वत:चे स्वत: शिकूदेखील लागले आहेत. मात्र काय शिकायचे आणि का शिकायचे, या प्रश्नांचा विचार त्यांना करता येणार नाही. एक व्यक्ती बोट दाखवते आहे त्याचा अर्थ काय, हे रोबोला प्रोग्रामिंग केले नसेल तर समजणार नाही. हे वैशिष्टय़ जपण्यासाठी आपण हेतूचा विचार करायला हवा. यालाच मूल्यविचार म्हणतात.

yashwel@gmail.com