सुनीत पोतनीस

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन लोक टोगो या पश्चिम आफ्रिकेतील प्रदेशात आले आणि  या प्रदेशाचे प्रशासन हातात घेऊन तिथे त्यांनी जर्मन टोगोलँड ही जर्मन साम्राज्याची वसाहत वसवली. पहिल्या महायुद्धात दोस्त राष्ट्रांनी जर्मनीच्या अ‍ॅक्सिस आघाडीचा पराभव करून जर्मनीव्याप्त टोगोलँडवर ताबा मिळवला आणि टोगोवरील जर्मनीचा अंमल १९१८ साली संपला. टोगोचा ताबा  युद्धातले जेते ब्रिटन आणि फ्रान्स यांच्याकडे संयुक्तपणे आला.

ब्रिटन आणि फ्रान्सचा टोगोवरचा संयुक्त अंमल फार काळ टिकला नाही. या दोन्ही राष्ट्रांनी ‘लीग ऑफ नेशन्स’मार्फत टोगोच्या प्रदेशाची २० जुलै १९२२ रोजी फाळणी केली. पश्चिमेकडील अर्धा प्रदेश ब्रिटनच्या मालकीचा झाला तर पूर्वेकडचा अर्धा भाग फ्रान्सच्या ताब्यात आला. जर्मन टोगोलँडचे आता ब्रिटिश टोगोलँड आणि फ्रेंच टोगोलँड हे दोन तुकडे झाले. दुसऱ्या  महायुद्धानंतर संयुक्त राष्ट्रसंघाने सार्वमत घेतले. ब्रिटिश टोगोलँडच्या जनतेने आपला प्रदेश पश्चिम आफ्रिकेतील ‘गोल्ड कोस्ट’ या ब्रिटिश साम्राज्याच्या वसाहतीमध्ये समाविष्ट होण्यासाठी कौल दिला. १९५७ साली गोल्ड कोस्ट आणि इतर काही प्रदेश मिळून घाना हे स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. १९५९ साली फ्रेंच टोगोलँडच्या जनतेने फ्रेंच टोगोलँड हा प्रजासत्ताक देश स्थापन केला. फ्रेंच टोगोलँड हा फ्रेंच युनियनचा सदस्य बनला. या देशाचे संरक्षण, परदेश संबंध आणि अर्थव्यवस्था यांची खाती फ्रेंच सरकारने स्वत:कडे ठेवली.

२७ एप्रिल १९६० रोजी फ्रेंच सरकारने फ्रेंच टोगोलँडच्या जनतेला स्वातंत्र्य प्रदान केले. फ्रेंच टोगोलँड हा आता ‘टोगोलीस रिपब्लिक’ बनून एक स्वतंत्र नवदेश अस्तित्वात आला. आफ्रिकन देशांना सततची यादवी, रक्तरंजित उठाव यांचा बहुधा शापच असावा! स्वातंत्र्यानंतरचे पहिले राष्ट्राध्यक्ष ऑलिंपियस यांची दोनच वर्षांत गोळी घालून हत्या झाली. त्यानंतर चार वर्षांनी, १९६७ साली लष्कराचे जनरल ग्नासिंग्बे याडेमा यांनी तत्पूर्वीचे सरकार उलथवून देशाची राज्यघटना, सर्व राजकीय पक्ष बरखास्त करून स्वत:ला टोगोचा राष्ट्राध्यक्ष घोषित केले. १९६७ ते त्यांचा २००५ साली मृत्यू होईपर्यंत ग्नासिंग्बे याडेमा हेच टोगोचे राष्ट्राध्यक्ष बनून राहिले, अन तेही ३८ वर्षे!

sunitpotnis94@gmail.com

Story img Loader