– डॉ. यश वेलणकर
मोठी स्वप्ने पाहणे किंवा महत्त्वाकांक्षी असणे हा काही आजार नाही. मात्र अशा स्वप्नांच्या पूर्ततेसाठी काही मार्ग ठरवला आहे का, मोठ्ठय़ा ध्येयाचे काही छोटे टप्पे ठरवले आहेत का, याचा विचार महत्त्वाचा असतो. हत्तीच्या आकाराचे चॉकलेट खाऊन संपवणेदेखील शक्य असते. पण ते एका दिवसात शक्य होणार नाही. त्याचे एका दिवशी खाता येतील असे छोटे छोटे भाग केले तर एक दिवस संपूर्ण चॉकलेट संपलेले असेल. मोठय़ा स्वप्नाचे असे रोजचे, आठवडय़ाचे, महिन्याचे, वर्षांचे ध्येय ठरवणे आणि त्यानुसार व्यवस्थापन करीत राहणे गरजेचे असते. ‘बायपोलर’ विकारातील उत्तेजित अवस्था आणि निरोगी मानसिकता यांमध्ये हा महत्त्वाचा फरक असतो. हा आजार असलेली व्यक्ती अवास्तव कल्पनांच्या नादात असे व्यवस्थापन करू शकत नाही. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसत नाही. ती केवळ दिवास्वप्ने पाहत राहते.
मोठ्ठी स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी भगवद्गीतेत सांगितलेल्या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. कृष्णाने अर्जुनाला समुपदेशन करून युद्ध लढण्यास प्रवृत्त केले, तसे कोणतेही स्वप्न साकार करायचे असेल तर संघर्ष करावा लागतो, मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी कर्ता व्हावे लागते. मात्र अशा संघर्षांनंतर जे फळ मिळते, त्याचा साक्षीभाव ठेवून स्वीकार करावा लागतो. असे केले तरच मनाची शांती आणि जिद्द कायम राहते. कोणतेही मोठे स्वप्न एकटय़ाच्या प्रयत्नाने प्रत्यक्षात येत नाही, त्यासाठी अनेकांचे सहकार्य लागते. यालाच गीतेत ‘लोकसंग्रह’ असे म्हटले आहे. जो माणसांना कंटाळत नाही आणि ज्याला माणसे कंटाळत नाहीत तोच लोकसंग्रह करू शकतो हा गीतेतील उपदेश आजही तेवढाच लागू होतो.
त्यामुळे लोकसंग्रह, भावनांचा समतोल आणि ध्येय ठरवून योग्य दिशेने केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न ही त्रिसूत्री कोणत्याही क्षेत्रात यशप्राप्तीसाठी आवश्यक असते. ध्येय ठरवताना वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करून त्यानुसार आखणी करणे योग्य ठरते. पर्यायी मार्गाचा विचार केला नसेल, तर अपयश आल्यास औदासीन्य येते. वरील त्रिसूत्री लक्षात ठेवली तर हे औदासीन्य टाळता येईल.
yashwel@gmail.com