डॉ. श्रुती पानसे
एखाद्या खेळण्याची किल्ली फिरवून लहान मुलाला ते खेळणं खेळायला दिलं, तर जोपर्यंत खेळणं चालू आहे तोपर्यंत त्याला खूप मजा येते. ज्या क्षणी खेळणं बंद पडतं, त्या क्षणी ते बंद का पडलं, याचा मूल विचार करायला लागतं. हलवून, आपटून, किल्ली फिरवून ते पुन्हा चालू करायचा प्रयत्न करतं. ते चालू झालं की, खेळ पुन्हा सुरू होतो. या काही मिनिटांमध्ये त्या मुलाच्या मेंदूमध्ये काय काय घडून गेलं?
एखादा माणूस एक नोकरी सोडून दुसरी नोकरी करण्याचा विचार करतो. ही प्रक्रिया एका दिवसात घडून येत नाही. सतत काही दिवस त्यावर विचार होतो. पुन:पुन्हा विचार करून, तपासून बघून त्यानंतर एक निर्णय घेणं, या मधल्या काळामध्ये मेंदूत काय घडून येतं?
तीन प्रश्नांपैकी दोन प्रश्न सोडवा, असं प्रश्नपत्रिकेत सांगितलं जातं; त्या वेळेला तीनही प्रश्न वाचून नक्की कोणते दोन प्रश्न सोडवायचे आहेत आणि जो तिसरा प्रश्न आहे- तो का नाही सोडवायचा, याचा निर्णय काही सेकंदांमध्ये मेंदूत घडून येतो.
इच्छित स्थळी निघालेले असताना या रस्त्यानं जायचं की दुसऱ्या रस्त्यानं, अशा अगदी साध्या उदाहरणातही मेंदूत खूप काही घडून येत असतं. ज्या वेळेला एखाद्या गोष्टीपासून मिळणारा अपेक्षित लाभ होत नाही किंवा होणार नाही, असा प्रश्न निर्माण होतो; त्या वेळेला मेंदूतल्या ‘डोपामाइन’ या रसायनाची पातळी कमी होते. ती कमी झाल्याक्षणी आपण दुसऱ्या मार्गाचा विचार सुरू करतो. हा विचार ‘फ्रण्टल लोब’मधील नियोजन, समस्या निवारण या केंद्राकडे जातो. इथं, आपण नक्की कशा पद्धतीनं हा प्रश्न सुटू शकेल, याचा अंदाज घेतो. पुन्हा प्रयत्न करत राहतो, त्या वेळेला ‘सेरोटोनिन’ या रसायनाचा प्रभाव सुरू होतो; कारण ते आपल्याला कार्यप्रवृत्त करत असतं. अशी अनेक क्षेत्रं आणि अनेक रसायनं मिळून हे काम करतात.
अशा प्रकारे समजा समस्या सुटली, तर निर्णय बरोबर आल्याच्या आनंदात मेंदूमध्ये आनंदाचं रसायन निर्माण होतं. जर समस्या सुटली नाही, तर दीर्घकाळ नकारात्मक रसायनांमध्ये मेंदू राहतो.
contact@shrutipanse.com