– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपण जे काही करतो ते का करीत आहोत, असा प्रश्न स्वत:ला विचारला की जे उत्तर येते ते त्या व्यक्तीचे ‘मूल्य’ असते. बालपणात ‘मजा करणे’ हे महत्त्वाचे मूल्य असते. पौगंडावस्थेत ‘स्वत:ची ओळख’ हे मूल्य महत्त्वाचे होते. सुरक्षितता, आरोग्य, ज्ञानप्राप्ती, समृद्धी, आराम, सुखोपभोग, परंपरांचे पालन, कर्तव्यपालन, नातेसंबंध, मैत्री, पालकत्व.. अशी अनेक मूल्ये आहेत. ‘मी नोकरी का करते/करतो,’ या प्रश्नाची- ‘पैसे मिळवण्यासाठी, स्वओळख निर्माण करण्यासाठी, वेळ चांगला घालवण्यासाठी..’ अशी अनेक उत्तरे असू शकतात. हे उत्तर म्हणजे मूल्य आहे. ‘पैसे कशासाठी मिळवायचे,’ याचेही उत्तर- ‘सुरक्षितता, संसार चालवण्यासाठी, सुखसाधने विकत घेण्यासाठी..’ असे वेगवेगळे असू शकते. असे प्रश्न स्वत:ला विचारल्याने आपण जे काही करतो आहोत त्याला आपण अर्थ देतो.

एखाद्याला परस्परविरोधी मूल्ये महत्त्वाची वाटत असतील तर त्याचा वैचारिक गोंधळ उडतो. म्हणजे सुरक्षितता आणि नावीन्य ही दोन मूल्ये एकाच वेळी असू शकत नाहीत. नावीन्यासाठी माणसाला थोडा धोका पत्करावा लागतो. नातेसंबंध आणि स्वातंत्र्य ही मूल्ये एकमेकांशी झगडू शकतात. अशा वेळी ‘हा वेळ’ नातेसंबंध या मूल्यासाठी आणि ‘हा वेळ’ स्वत:च्या स्वातंत्र्यासाठी देणार आहे असे ठरवावे लागते. मूल्य म्हणजे ध्येय नाही. ध्येय साध्य होते; मूल्य ही दिशा असते, ती सतत चालणारी प्रक्रिया असते. उदाहरणार्थ, सर्जनशीलता हे मूल्य आहे आणि रोज एक चित्र काढेन हे ध्येय आहे. ध्येयप्राप्तीमध्ये अडचणी येऊ शकतात, त्यामुळे ते कमी-जास्त होऊ शकते. मात्र, मूल्याचा विचार केला नसेल तर आपण दिशाहीन गोलगोल फिरत राहण्याची शक्यता असते.

कोणत्याही दोन व्यक्तींची सारी मूल्ये सारखीच असतील असे नाही. ‘माझीच मूल्ये सर्वानी मान्य करायला हवीत’ असा एखादा माणूस दुराग्रह करू लागतो त्या वेळी वाद होऊ लागतात. स्वच्छता हे मूल्य आहे हे सर्वानाच मान्य असते; पण त्याचा दुराग्रह होऊ लागतो आणि स्वत:ची ओळख किंवा बंडखोरी हे मूल्य अधिक महत्त्वाचे वाटू लागले, की घरोघरी वाद सुरू होतात. आधुनिक काळात आज्ञाधारकपणापेक्षा व्यक्तिस्वातंत्र्य हे मूल्य प्रभावी झाल्याने हे वाद वाढले आहेत. कोणतेही मूल्य ही दिशा ठरवण्याची निर्णयप्रक्रिया असल्याने प्रत्येक मूल्याचे फायदे-तोटे असतात, हेही लक्षात ठेवावे.

yashwel@gmail.com