– डॉ. यश वेलणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्राचीन काळापासून मूल्यांचा विचार होत आहे. मूल्ये कशी ठरवायची, याचे दिशादर्शन अ‍ॅरिस्टॉटलने केले आहे. त्याच्या मते, कोणत्याही गुणाचा अतिरेक झाला की तो दोष होतो. त्यामुळे ‘समतोलपणा’ हे मूल्य आहे. जे मौल्यवान वाटते, कोणत्याही कृतीला आणि आयुष्यालाही अर्थ प्राप्त करून देते ते मूल्य होय. भारतीय तत्त्वज्ञानात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चार पुरुषार्थ म्हणजे आयुष्याला अर्थ देणारी चार मूल्ये आहेत. माणूस सहसा मूल्यांचा जाणीवपूर्वक विचार करीत नाही, पण अजाणतेपणे तो जे निर्णय घेतो ते सुप्त मनात ठसलेल्या मूल्यानुसार घेत असतो. कुटुंबात, समाजात, शिक्षणात जे काही संस्कार केले जातात, ते ‘मूल्य’संस्कारच असतात.

मूल मोठे होत असताना जे अनुभव घेते, त्यानुसारही त्याच्या सुप्त मनात मूल्ये आकार घेतात. यासाठी पौगंडावस्थेपासूनच मुलांशी या विषयावर गप्पा मारायला हव्यात. त्यांना भावनांविषयी सजग करायला हवे, तसेच ‘मूल्य’ संकल्पनेचीही ओळख करून द्यायला हवी. पण त्यासाठी मोठय़ा माणसांनीदेखील स्वत:च्या मूल्यांचा विचार करायला हवा. ‘वडीलधाऱ्यांचा आदर’ हे भारतीय संस्कृतीमधील एक मूल्य आहे. वडीलधाऱ्यांना केलेला नमस्कार या मूल्याचा परिणाम म्हणून होणारे वर्तन आहे. याप्रमाणेच, माणूस कोणतीही कृती करतो त्यामागे कोणते तरी मूल्य असते. व्यवस्थितपणा हे मूल्य असेल तर बाहेरून आल्यानंतर कपडे नीट ठेवले जातात. आरोग्य हे मूल्य असेल तर वेळोवेळी हात धुतले जातात. बऱ्याचशा मूल्यांचा संस्कार हा बोलण्यापेक्षा आचरणातून होतो.

मात्र, मुले मोठी होतात तशी जुन्या मूल्यांना नाकारू शकतात. त्यांची स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी वेगळी मूल्ये निवडू शकतात. पिढीनुसार आणि वयानुसार मूल्ये बदलतात. कोणत्याही दोन माणसांतील तात्त्विक संघर्ष हा दोन मूल्यांचा संघर्ष असतो. समुपदेशकाने स्वत:ची मूल्ये ठरवावीत, मात्र समुपदेशन करताना त्यांचा आग्रह धरू नये. मानसोपचार घेण्यासाठी एखादी व्यक्ती येते तेव्हा आरोग्य, मानसिक शांती किंवा प्रगती हे तिचे मूल्य असतेच. त्याबरोबर अन्य कोणती मूल्ये त्या व्यक्तीला महत्त्वाची वाटतात हे समजून घेणे, तो विचार करायला प्रवृत्त करणे हे समुपदेशनाचे एक ध्येय असते.

yashwel@gmail.com