डॉ. श्रुती पानसे

आपल्या प्रत्येकाकडे भरपूर निरीक्षण आणि विश्लेषण क्षमता असते. पण ती पुष्कळवेळा वापरली जात नाही. एखादी वस्तू कशी असते हे एकदा समजलं की पुन्हा म्हणून आपण त्या वस्तूच्या बांधणीचं निरीक्षण करायला जात नाही. विश्लेषण ही त्यापुढची गोष्ट आहे. अगदी आठ-दहा वर्षांपर्यंतची मुलं दिसलेल्या प्रत्येक वस्तूचं निरीक्षण करतातच. माणसांच्या चेहऱ्याचं निरीक्षण करतात, तेव्हा ते रचना बघत असतात. पुढे त्या रचनेतलं सौंदर्यही दिसलं पाहिजे, नाही तर ते दाखवलं पाहिजे.  उदाहरणार्थ, मधाच्या पोळ्याच्या एखाद्या तुकडय़ात काय बघायला मिळतं? एकसारख्या सुबक षटकोनांच्या रांगा. हात लावला तर एक वेगळाच निसर्गनिर्मित पोत. हाच तुकडा सरळ, उलटा, तिरका बघितला, भिंगातून बघितला, तर दर वेळी एक नवीन चित्र बघितल्यासारखं वाटतं. याच पद्धतीने कोणताही एक विषय घेऊन आपण निरीक्षण आणि त्यातून विश्लेषणाकडे जाऊ शकतो. काही माणसं ही कलात्मक नजर कायम जागती ठेवतात. म्हणून तर दगड कोरून निर्माण केलेली शिल्पं दिसतात. फांदीला, अगदी वाळलेल्या फुला-पानांपासूनही कलाकृती तयार होतात. काष्ठशिल्पं तयार होतात.

वस्तू वेगवेगळ्या पद्धतीने बघायला काहीच हरकत नसते. कारण त्यातून नव्या गोष्टी समजत जाण्याची शक्यता फारच असते, हे एक. आणि दुसरं म्हणजे, त्यातून आपण चिकित्सक होत जातो. एखादं पुस्तक वेगवेगळ्या वयात वाचलं तर त्यातून जाणवलेल्या, आवडलेल्या, न आवडलेल्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. पंधरा-सोळाव्या वर्षी वाचलेल्या काही गोष्टींचा अर्थ पंचविसाव्या वर्षी नव्याने लागतो. तोच अर्थ चाळिसाव्या आणि साठाव्या वर्षी वेगवेगळा भासतो. कारण मधल्या काळात आपण अनुभवी झालेले असतो. त्यामुळे अर्थाची वलयं बदलत असतात. विश्लेषणाची सवय लागलेली असते. पाठय़पुस्तकात वाचलेल्या एखाद्या गोष्टीबद्दल, कवितेबद्दल, लेखक किंवा कवीबद्दल, त्यातल्या एखाद्या शास्त्रीय संकल्पनेबद्दल, चित्रकृतीबद्दल, इतिहासातल्या एखाद्या घटनेबद्दल – पुढे अनेक वर्षांनी ‘याचा शोध घ्यावा’, असं वाटू शकतं. यातून लहानपणी जाणता किंवा अजाणतेपणी केलेलं निरीक्षण असतं. लहानपणी ती संकल्पना मेंदूत रुजून बसलेली असते. त्यामुळे पुढे विश्लेषणाला वाव मिळतो.

contact@shrutipanse.com

(चित्र : पिकासोचा ‘सायकल बैल’)