– डॉ. यश वेलणकर
माणसाच्या झोपेचे डोळ्यांच्या बुबुळाची हालचाल होणारी आणि हालचाल न होणारी झोप असे दोन प्रकार असतात. आपली अर्ध जागृतावस्था असते त्यावेळीही काही दृश्ये दिसू लागतात. मात्र ही स्वप्ने नसतात. याला झोपेपूर्वीचे भास (हिप्नॉगॉगिक हॅल्युसिनेशन्स) म्हणतात. या अवस्थेनंतर झोप सुरू होते. या वेळी मेंदूतील लहरी संथ होतात. बुबुळे शांत असतात. ही अवस्था पाच, दहा मिनिटेच राहते. हीच झोप अधिक वेळ राहिली तर माणसाला शांत झोप लागली असे वाटत नाही. या स्थितीत हलक्या आवाजानेही जाग येते. यानंतरची स्थिती स्टेज दोन अधिक गाढ झोपेची असते. शरीराचे तापमान, श्वासगती आणि हृदयाचे ठोके कमी होतात. या वेळी मेंदूत काही वेगवान लहरी निर्माण होतात, त्यांना स्लीप स्पिंडल्स म्हणतात. आपल्या एकूण झोपेतील ५० टक्के भाग या झोपेचा असतो; मात्र तो सलग नसतो. ही झोप २०/ २५ मिनिटे झाली, की अधिक गाढ झोपेची स्थिती सुरू होते. या वेळी रक्तदाब कमी होतो, सारे स्नायू शिथिल होतात. या झोपेत असताना बाह्य वातावरणाची जाणीव खूपच कमी असते. हाका मारल्या तरी जाग येत नाही त्या वेळी अशी झोप चालू असते. लहान मुले झोपेत शू करतात, त्या वेळी बऱ्याचदा या स्थितीत असतात. काही जण या झोपेत चालतात पण जागे झाल्यानंतर ते त्यांना आठवत नाही. या नंतर बुबुळे हालणारी झोप सुरू होते. स्नायू पूर्णत: शिथिल, म्हणजे अजिबात हलू शकत नाही असे होतात. मात्र मेंदूची सक्रियता वाढते. याच वेळी स्वप्ने पडू लागतात. श्वासगती आणि हृदयाची गती वाढते. या झोपेचा काल एकूण झोपेच्या साधारण २० टक्के असतो. झोप लागल्यानंतर साधारण दीड तासांनी ही स्थिती येते. मात्र ती फार वेळ नसते. पाच/दहा मिनिटांत पुन्हा बुबुळे शांत होतात आणि गाढ झोपेच्या आधीची झोप म्हणजे ‘स्टेज २’ सुरू होते, पुन्हा ‘स्टेज ३’, स्वप्नांची झोप आणि ‘स्टेज २’ असे चक्र रात्रभर चालू राहते. सात तासांच्या झोपेत अशी चार ते पाच चक्रे होतात. अधिकाधिक वेळ झोप मिळाली की स्वप्नांच्या झोपेचा कालावधी वाढत जातो. त्यामुळे पहाटे स्वप्नांची झोप अधिक वेळ म्हणजे सलग अर्धा तासदेखील राहते. या स्थितीत जाग आली तर स्वप्ने आठवतात. स्वप्नविरहित झोपेच्या काळात जाग आली तर स्वप्ने फारशी आठवत नाहीत.
yashwel@gmail.com