– डॉ. यश वेलणकर
साक्षीध्यान हा ध्यानाचा दुसरा प्रकार आहे. त्याची सुरुवात श्वासावर लक्ष ठेवून केली जाते. असे लक्ष ठेवले असताना मन भरकटते. ते कुठे जाते यावर लक्ष ठेवायचे. मनात विचार येतात, त्यांना नाकारायचे नाही. हे विचार हे चांगले, हे वाईट, नकारात्मक अशी प्रतिक्रियाही करायची नाही. भान येईल तेव्हा मनात हे-हे विचार आहेत अशी नोंद करायची आणि लक्ष पुन्हा श्वासावर आणायचे. काही विचार मनात राग, भीती, चिंता, उदासी अशा भावना निर्माण करतात; त्यांनाही नाकारायचे नाही. ‘भीती नको’ अशीही प्रतिक्रिया करायची नाही. हाच साक्षीभाव होय.
मनात अशा भावना असतात तेव्हा शरीरात काही रसायने पाझरत असतात. त्यामुळे शरीरात संवेदना जाणवू शकतात. छातीवर भार, डोके जड, पोटात हालचाल, बोटात कंप या संवेदना आहेत. त्यांनाही ‘या नको’ अशी प्रतिक्रिया करायची नाही. या संवेदना जाणवण्यासाठी शरीरावर पुन:पुन्हा लक्ष नेण्याचा सराव करावा लागतो. श्वासाची हालचाल किंवा स्पर्श हीदेखील एक संवेदनाच आहे, त्याकडेही लक्ष द्यायचे. लक्ष विस्तारित करून संपूर्ण शरीरात या क्षणी काय होते आहे, याकडेही लक्ष ठेवायचे. काही वेळा बाह्य़ आवाज, गंध यांकडेही लक्ष जाते. त्याचा परिणाम म्हणून मनात विचार, भावना येतात आणि शरीरात संवेदना जाणवू लागतात. साक्षीध्यानाचा परमोच्च बिंदू म्हणजे परिसरात, मनात आणि शरीरात जे काही घडते आहे, त्यांचा एकमेकांवर काय परिणाम होत आहे हे साक्षीभाव ठेवून जाणत राहणे होय. यालाच ‘पूर्णभान’ म्हणतात.
साक्षीध्यानात एकाग्रता अपेक्षित नसते, मनात येणाऱ्या विचारांकडे साक्षीभाव ठेवून पाहता येणे अपेक्षित असते. असे विचार आले, की शरीराकडे लक्ष नेऊन संवेदना स्वीकारण्याचा सराव करायचा असतो. असा स्वीकार होतो तेव्हा भावनिक मेंदू ‘अमीग्डला’ची सक्रियता कमी होते. चिंता, भीती, आघातोत्तर तणाव असे त्रास असताना याच भागाची संवेदनशीलता वाढलेली असते. साक्षीध्यानाने ती कमी होत असल्याने हे ध्यान उपचार म्हणून उपयुक्त आहे. ‘अष्टावक्र गीता’ हाच साक्षीभाव सांगणारी आहे. विपश्यना, प्रेक्षाध्यान हेही साक्षीध्यान आहे. ‘अष्टांगयोगा’त ‘विवेकख्याती’ या नावाने हा साक्षीभाव सांगितला आहे. ‘आयुर्वेदा’त ‘स्मृतिविभ्रंश’ म्हणजे साक्षीभावाचा विसर असे सांगितले आहे. तो दूर करायचा म्हणजे शरीर व मनात जे काही जाणवते, त्याचा स्वीकार करायचा!
yashwel@gmail.com