प्रदीप नायक

प्राचीन काळापासून ज्ञात असलेल्या बुध ते शनी या ग्रहांची सूर्यापासूनची सरासरी अंतरे जर्मन खगोलज्ञ योहान्नस केपलरच्या नियमामुळे सतराव्या शतकात माहीत झाली. खगोलशास्त्रीय एककांत (ख.ए. – सूर्य व पृथ्वी या दरम्यानचे सरासरी अंतर) ही अंतरे अशी आहेत : बुध – ०.४, शुक्र – ०.७, पृथ्वी – १.०, मंगळ – १.५, गुरू – ५.२ आणि शनी – ९.६. मंगळ आणि गुरू यांतील अंतर बरेच असून, यामध्ये एखादा ग्रह असण्याची शक्यता केपलरने व्यक्त केली होती. त्यानंतर १७६६ मध्ये योहान टिटियस आणि योहान बोड या जर्मन खगोलज्ञांनी ग्रहांची अंतरे ०.४, ०.७, १.०, १.६, (२.८), ५.२, १०.०, (१९.६),.. ख.ए. या श्रेणीत बसत असल्याचे स्वतंत्रपणे दाखवून दिले. या श्रेणीत २.८ ख.ए. आणि १९.६ ख.ए. अंतरावर एकही ज्ञात ग्रह नव्हता.

इ.स. १७८१मध्ये युरेनसचा शोध लागल्यानंतर, युरेनसचे सूर्यापासूनचे १९.२ ख.ए. हे अंतर टिटियस-बोड नियमानुसारच्या अपेक्षित अंतराच्या जवळ भरले. यापासून स्फूर्ती मिळून, सन १८००च्या सप्टेंबर महिन्यात योहान बोड आणि काही खगोलज्ञांनी सूर्यापासूनचा २.८ ख.ए. अंतरावरचा ‘अज्ञात ग्रह’ शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली व विविध खगोलज्ञांना या अज्ञात ग्रहाचा शोध घेण्याची विनंती करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात, या यादीतल्याच ज्युसेप्पे पियाझ्झी या इटालियन खगोलज्ञाने एक जानेवारी १८०१ रोजी वृषभ तारकासमूहात एक ‘नवा तारा’ शोधला होता.

काही दिवसांच्या निरीक्षणांनंतर पियाझ्झीने आपला शोध योहान बोडला कळवला. इतरांनी या ताऱ्याची निरीक्षणे सुरू करेपर्यंत, सूर्याभोवती प्रदक्षिणा घालताना हा तारा सूर्यतेजात लुप्त झाल्याने दिसेनासा झाला. या नव्या ताऱ्याच्या कक्षेच्या प्राथमिक गणितावरून हा तारा म्हणजे मंगळ आणि गुरू या दरम्यानचा अज्ञात ग्रह असण्याची खगोलशास्त्रज्ञांना खात्री पटली. सूर्यतेजातून बाहेर आल्यानंतर मात्र या ‘ग्रहा’चा शोध लागेना. अखेर जर्मन गणितज्ञ कार्ल गाऊस याने आपल्या गणिताद्वारे या ग्रहाची कक्षा पुन्हा निश्चित केली व त्यावरून दिनांक ३१ डिसेंबर १८०१ रोजी हा सूर्यापासूनचा पाचवा ग्रह पुन्हा शोधला गेला. पियाझ्झीने सुचवल्याप्रमाणे या ग्रहाला ‘सिरिस’ हे रोमन कृषिदेवतेचे नाव देण्यात आले. अवघ्या साडेनऊशे किलोमीटर व्यासाच्या या ग्रहाचा आज खुजाग्रहांच्या गटात समावेश केला गेला आहे.

मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२

office@mavipamumbai.org

Story img Loader