अ. पां. देशपांडे
काळाच्या ओघात अनेक गोष्टी लुप्त झाल्या आहेत. ६५ वर्षांपूर्वी अभियांत्रिकी अभ्यासक्रमात ए-१ (१.५ मीटर लांब ७ १ मीटर रुंद) आकाराचा बोर्ड आणि टी स्क्वेअर वापरला जात असे. आता हे सर्व संगणकात आल्याने या गोष्टी वापरण्याची गरज उरली नाही. तीच गोष्ट आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात घडत आहे.
कारखान्यात जी जी धोक्याची कामे आहेत, जी करताना अपघात होऊन जीवितहानी होणे संभवनीय आहे अथवा आरोग्याला धोका आहे अशा ठिकाणी आता यंत्रमानव काम करू लागले आहेत. पोलाद बनवणाऱ्या भट्ट्या जेथे खूप उष्णतेला तोंड द्यावे लागते अथवा वस्त्रोद्याोगात पूर्वी सुताचे धागे फुप्फुसात जाऊन लोकांना फायाब्रोसीस होत असे. अशा कित्येक ठिकाणी आता माणसांना काम करण्याची गरज राहिलेली नाही. माणसाला रोज तेच ते काम करायचा कंटाळा येतो. उदा. फार पूर्वी एखादा पत्र्याचा डबा बनवायचा असेल तर एक माणूस तो पूर्णपणे बनवायचा. पण औद्याोगिक क्रांतीत उत्पादन वाढवण्यासाठी कन्व्हेअर बेल्टची कल्पना आली आणि त्याच्या भोवती बसलेली माणसे एकाच भागाचे काम दिवसभर करू लागली. यामुळे उत्पादन वाढले, पण कामातील एकसुरीपणा वाढला. आता ही कामे यंत्रमानव करू लागल्यावर हा एकसुरीपणा संपला. असे असले, तरी यामुळे माणसांची कामे जातील आणि बेरोजगारी वाढेल त्याचे काय, असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे, मात्र काळ या अडचणी हळूहळू सोडवतो. आपल्याला आज त्याची कल्पना येत नाही. उदा. संगणक आल्यावर टंकलेखक बेरोजगार होतील, कारण प्रत्येकजण आपापले काम स्वत:च करेल, अशी भीती व्यक्त होत होती, पण संगणक आल्यावर त्याची होणारी सततची देखभाल-दुरुस्ती सुरूच आहे. त्यासाठी बदलावे लागणारे की बोर्ड. माउस आणि कितीतरी सुटे भाग पुरवणे, मुळात ते बनवणे हे काम अखंडपणे सुरूच आहे. कामाचे स्वरूप बदलते, माणसे फार काळ बेरोजगार राहात नाहीत. आज सायबर गुन्हेगारी वाढली असून त्यापाठोपाठ या गुन्ह्यांची उकल करणाऱ्या लोकांची गरजही वाढू लागली.
हेही वाचा : कुतूहल : एकाकीपणाच्या निदानासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत
मराठी विज्ञान परिषद ‘कुतूहल’ हे सदर सन २००६ पासून चालवत आहे. हे सरते वर्ष या मालिकेतील १९ वे वर्ष. या सदरातील जरी हा शेवटचा लेख असला तरीदेखील कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा आवाका पाहता ही केवळ सुरुवात आहे. या क्षेत्रात पुढे कोणत्या घडामोडी घडतील याची आजच कल्पना येणे शक्य नाही. या वर्षी या सदरातून कृत्रिम बुद्धिमत्ता विषयासंदर्भातील अद्यायावत माहिती तज्ज्ञ लेखकांकरवी वाचकांपर्यंत पोहोचविता आली, याचा आनंद आहे. ‘लोकसत्ता’च्या वाचकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. पुढील वर्षी एक नवीन विषय…
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org