अमेरिकन वाहनांमध्ये २०२३ च्या कार्स डॉट कॉमच्या मानांकनानुसार टेस्लाने पहिल्या ५ पैकी ४ मानांकने पटकावली आहेत. काय बरे कारण असेल की एखादा नवखा खेळाडू इतर प्रस्थापितांना मागे टाकतो? हे उद्योग नेहमीच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे, विशेष करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा कल्पक आणि व्यापक उपयोग करून घेणे यास प्राधान्य देतात. टेस्लाच्या घवघवीत यशामागचे हेच कारण आहे.
स्वायत्त, स्वयंचलित वाहनांपासून ते विविध संगणकीय प्रणालींद्वारे संलग्न आणि नियंत्रित वाहनांपर्यंत, वाहनउद्योगातील अनेक मोठे आविष्कार कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने संगणकीय दृष्टीचा (कॉम्प्युटर व्हिजनचा) तसेच स्वयंचलित यंत्रमानव (ऑटोमेटेड रोबोट्स) इत्यादी तंत्रांचा वापर करून वाहन निर्मात्यांना स्मार्ट, सुरक्षित वाहने तयार करण्यात मदत केली आहे. चालकाला सुरक्षित, आरामदायी व किफायतशीर अनुभव देण्यात कृत्रिम बुद्धिमत्ता किंचितही मागे नाही.
हेही वाचा : कुतूहल : वाहनउद्योगातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भरारी
जगात सर्वाधिक अपघात भारतात होतात. त्यावर मात म्हणून भारत सरकारने अनेक उपाय योजिले आहेत. भविष्यात प्रगत चालक साहाय्य प्रणाली (अॅडव्हान्सड ड्राइवर असिस्टन्स सिस्टीम) बंधनकारक करण्याच्या विचारात आहे. भारत अपघातविरहित आणि सुरक्षित प्रवासाच्या दिशेने जात असल्याचे हे चिन्ह आहे.
कृत्रिम बुद्धिमत्ता वाहनविषयक विम्यामध्येदेखील मदत करू शकते. चालकाच्या सवयी व वर्तनांवर आधारित विमा हप्ता निर्धारित करता येऊ शकतो. विमा दाव्यांचा अर्ज भरताना अपघाताची संपूर्ण माहिती विविध संवेदकांच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने गोळा होऊ शकते. मार्गिका निर्गमन चेतावणी (लेन डिपार्चर वॉर्निंग), स्वयंचलित आपत्कालीन गतिनिरोध साहाय्य (ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग) आणि आवश्यकतेनुसार वेग नियंत्रण (अॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल) यासारख्या काही अत्यंत कार्यक्षम सुरक्षा प्रणालींमुळे चालकाला संभाव्य धोक्यांबद्दल वेळीच सावध केले जाऊ शकते.
हेही वाचा : कुतूहल : ‘ओपन एआय’ची वाटचाल
त्वरित प्रतिबंधात्मक पावले उचलली जाऊ शकतात आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे घातक अपघात टाळता येऊ शकतात. चालकाच्या सोयीसाठी अंध-बिंदू नियंत्रण प्रणाली (ड्रायव्हर असिस्ट ब्लाइंड स्पॉट्स मॉनिटरिंग सिस्टीम) निरीक्षण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करते. संभाव्य अडथळे जवळ असताना चालकाला इशारा देते. याची पुढची पायरी म्हणजे चालक नियंत्रण प्रणाली (ड्रायव्हर मॉनिटरिंग). चालक गाडी चालवताना झोपी जाण्याचा धोका असू शकतो. ही प्रणाली याचा अंदाज आधीच लावण्यास सक्षम आहे.
कौस्तुभ जोशी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org