डॉ. मेघश्री दळवी
असंख्य वेगवेगळ्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत होऊ शकते. त्यात मानसिक आरोग्य हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. आज अनेक तरुण आणि वृद्ध माणसे एकटेपणाशी सामना करत आहेत. त्यांना मोकळेपणाने बोलण्यासाठी चॅटबॉटची खूप मदत होते असे निरीक्षण आहे. मात्र काही वेळा यासारख्या मानसिक समस्यांचे निदान लवकर होत नाही. रुग्णही आपणहून बोलून दाखवत नाहीत. अशा वेळेस एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला त्यांच्याशी बोलून त्यांची समस्या ओळखून घेण्याची गरज भासते. आता यात कृत्रिम बुद्धिमत्तेचे मोठे साहाय्य होऊ शकते.
‘सायकिआट्री रिसर्च’ या संशोधनपत्रिकेत नुकताच यावर एक शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. माणसांच्या बोलण्याच्या नमुन्यांचे विश्लेषण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापर केला तर त्यावरून अनेक दुवे मिळू शकतात. या अभ्यासात दिसून आले की एकाकीपणाचा त्रास नसणारी माणसे मोकळेपणी इतरांविषयी, कुटुंबाविषयी, आणि सामाजिक संबंधांवर चर्चा करतात. त्यांच्यात समूहभावना आणि सामाजिक योगदान दिसते. बोलताना आम्ही, आमचे अशा शब्दांचा वापर असतो. उलट एकाकीपणाशी लढणाऱ्या व्यक्ती अधिक स्व-केंद्रित भाषा वापरतात. त्यांच्या बोलण्यात नकारात्मक भावना जास्त असतात. एकटे पडल्याची तीव्र जाणीव आढळते. बोलताना चाचरणे, पुनरावृत्ती, अनावश्यक कारणमीमांसा देणे हेही दिसते.
एकटेपणाचे मूल्यमापन करण्यासाठी या संशोधनात वापरलेली प्रणाली जे बोलले आहे त्याचे विश्लेषण तर करतेच, शिवाय बोलण्याची पद्धत आणि त्यातले अव्यक्त भाव यांचाही संदर्भ घेते. विशेषत: वयस्कर व्यक्ती कसा संवाद साधतात याचे सूक्ष्म विश्लेषण करून त्यावरून ही प्रणाली निष्कर्ष काढते.
सर्वसाधारणपणे एकाकीपणाचे मूल्यमापन करताना रुग्णांनी स्वत:हून माहिती द्यावी अशी अपेक्षा असते. अर्थात त्यात माहिती एकदम अचूक मिळत नाही. फक्त रुग्णाची बाजू समोर आल्याने ही माहिती एकांगी आणि पूर्वग्रहदूषित असू शकते. एका रुग्णाशी अनेक वेळा बोलून काटेकोर चिकित्सा करायची म्हटले तर हे काम वेळखाऊ होते. या कारणांनी एकाकीपणाचे निदान योग्य वेळेत होत नाही असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून पहाण्याचे कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापिका एलन ली यांनी ठरवले. त्यातून हे संशोधन आकाराला आले. अशा प्रकारचे संशोधन हे मानसिक आरोग्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराविषयी एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.
डॉ. मेघश्री दळवी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org