समुद्रविज्ञान आणि समुद्रातील विविध जैवसंपदेचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जातो. विविध सागरी प्रजातींची वर्तणूक अभ्यासणे, तसेच सागरी जीवांची रहस्ये जाणून घेणे त्यामुळे सुलभ झाले आहे. आतापर्यंत अशी निरीक्षणे करण्यासाठी पाण्याखाली डुबकी मारावी लागत असे. त्यासाठी आवश्यक आणि प्रशिक्षित मनुष्यबळ लागत असे. आता यावर कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा उपाय आहे. अन्नाच्या उपलब्धतेनुसार तसेच अधिवासातील परिस्थिती आणि हवामान बदलासारख्या मनुष्यनिर्मित संकटांवर विविध सागरी जीवांच्या हालचाली अवलंबून असतात. याचा सखोल अभ्यास करायला कृत्रिम बुद्धिमत्तेतील संगणकीय दृष्टी हे तंत्र वापरून तपास करता येतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कायदा

मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असलेल्या विदांचे काटेकोर पद्धतीने विश्लेषण कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे करता येते. त्यामुळे शास्त्रज्ञांना प्रजातींवर व्यवस्थित लक्ष ठेवून त्यांचे व्यवस्थापन करणे सोपे पडते. विशेषत: ‘लुप्त होत असलेल्या प्रजाती’ आणि त्यांचे संरक्षण आणि संवर्धन या बाबतीत कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्राची मदत होत आहे. सागरामधील विविध प्लवक प्रजाती आणि मत्स्य साठे यांचा एकमेकांशी असलेला संबंध कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अभ्यासात्मक निरीक्षणे करून सर्वमान्य केला जातो. यात प्रजातींची मोजदाद, त्यांची टक्केवारी, त्यांच्या आकाराचे निरीक्षण, विविध प्रजातींची नेमकी ओळख, प्रजातीनुरूप असलेला फरक इत्यादी विषयीचा अभ्यास आता सागरी पर्यावरण अभ्यासक करू लागले आहेत.

हेही वाचा >>> कुतूहल: आभासी विश्वातील ‘धडे’

एरवी ज्यासाठी बरेच मनुष्यबळ, काळ आणि साधनसामग्री वापरायला लागली असती त्या बाबी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विशाल भाषा प्रारूप आणि तंत्र शिक्षण या प्रणालीमुळे अतिशय सहजतेने करता येतात. मत्स्य शास्त्रज्ञांना मत्स्य प्रजातीच्या विविध अंगांचा अभ्यास आता करता येऊ लागला आहे. यात मत्स्य प्रजातींचे वर्गीकरण, तसेच मासे कुठून कोठे जातात, या त्यांच्या मार्गाचे अवलोकन, माशांची योग्य ती ओळख, या बाबी कृत्रिम न्यूरल नेटवर्क आणि यंत्र शिक्षण या तंत्राच्या आधारे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सागरी पर्यावरणतज्ज्ञ करीत आहेत. माशांच्या हालचालींवरून त्यांच्या वर्तणुकीचा अंदाज बांधता येतो. या सर्व विदेवरून मासेमारीसाठी कोणत्या प्रकारची जाळी वापरता येतील, याचाही अंदाज मत्स्य शास्त्रज्ञ करत आहेत. याबाबतचे जे शास्त्र आहे, त्याला ‘गिअर तंत्रज्ञान’ असे म्हणतात. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ‘गिअर तंत्रज्ञाना’मध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल घडत आहेत.

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Artificial intelligence for oceanography studies zws