एके काळी हेन्री फोर्ड म्हणाले होते, ‘कुठल्याही ग्राहकाला आपली गाडी कुठल्याही रंगात मिळू शकेल… जोपर्यंत तो रंग काळा आहे तोपर्यंत(च)!’ अर्थात मोठ्या प्रमाणात उत्पादन करून ‘जे बनेल ते विकेल’ ही मानसिकता होती ती पूर्णपणे बदलत जाऊन ‘ज्याची गरज असेल ते बनेल’ हा मंत्र रूढ झाला आहे. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यात वाहन उद्योग नेहमीच अग्रेसर राहिला आहे.

बदलत्या काळाची गरज ओळखून कल्पकता दाखवत वाहन उद्योग तग धरून आहे. बदलती समीकरणे अचूक ओळखल्याने महागाई, आर्थिक मंदीच्या काळातही तरला आहे. अलीकडच्या काळात, वाहन उद्योगाच्या परिवर्तनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा फार मोठा वाटा आहे.

गाडी विकत घ्यायच्या प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी म्हणजे गाडी चालवण्याचे प्रशिक्षण. कृत्रिम बुद्धिमत्तेने ही पायरी अगदी सोप्पी आणि सोयीस्कर केली आहे. शिकाऊ चालकाची गाडी हाताळण्याची पद्धत, त्याचे कौशल्य इत्यादींचा विचार करून प्रत्येक व्यक्तिनुरूप प्रशिक्षण अभ्यासक्रम बनवणे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शक्य झाले आहे.

हेही वाचा : कुतूहल : हस्ताक्षर ओळख – वैविध्यातून शिक्षण

आभासी वास्तव (व्हर्चुअल रिअॅलिटी) आणि संवर्धित वास्तव (ऑगमेंटेड रिअॅलिटी) यांचा मिलाफ करून चालक प्रशिक्षण वर्ग काही वर्षांपासून सुरू झाले आहेत. उत्तम प्रतिसाद, कमी धोका, कमी खर्च (इंधन देखभाल) वैयक्तिक अभ्यासक्रम आदी गोष्टींमुळे हे प्रशिक्षण वर्ग कमालीचे लोकप्रिय झाले आहेत.

प्रत्यक्षात गाडी विकत घेण्याचे किचकट कामदेखील कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अतिशय सोपे व सरळ झाले आहे.

एका सर्वेक्षणानुसार तब्बल ७६ टक्के वाहन विक्रेत्यांच्या मते, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे त्यांच्या व्यवसायात सकारात्मक फायदा झाला आहे.

विशाल भाषा प्रारूपाचा वापर करून कल्पक जाहिराती व योग्य विपणन पद्धतीचा अवलंब करणे, वितरकाकडे भेट देऊन गेलेल्या लोकांशी अनेक समाज माध्यमांद्वारे कायम संपर्कात राहणे, चॅटजीपीटीचा वापर करून गाडीच्या सर्व वैशिष्ट्यांचा दृक्श्राव्य (ऑडिओ व्हिज्युअल) आभासी दौरा घडवणे इत्यादी अनेक गोष्टींमुळे कमी खर्च, कमी वेळात, अधिक चांगल्या प्रकारे माहिती संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचवली जाते.

हेही वाचा : कुतूहल : ‘ओपन एआय’ची वाटचाल

प्रत्यक्ष गाडीच्या वापरात तर आणखीच जास्त उपयुक्त बदल कृत्रिम बुद्धिमत्तेने घडवले आहेत. चालक-विरहित वाहन, अपघात अवरोधक प्रणाली यासारख्या अनेक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आविष्कारांचा त्यात समावेश झाला आहे.

कौस्तुभ जोशी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org