वाहन उद्योगातील गुणवत्ता नियंत्रण हे एक महत्त्वाचे परंतु तितकेच आव्हानात्मक कार्य आहे. मानवी नियंत्रणाला/ तपासणीला काही मर्यादा आहेत, त्यामुळे ती निर्दोष नाही. मानवी चुकांमुळे झालेल्या कोट्यवधींच्या नुकसानाबद्दल आपण ऐकून आहोत. त्यामुळे गुणवत्ता तर कमी होतेच पण या गुणवत्तेच्या समस्यांमुळे अनेकदा मागणी आणि पुरवठा साखळीतही व्यत्यय येतो. कारण सदोष वाहन अथवा त्याचे भाग परत मागवणे, ते बदलणे किंवा त्यांची दुरुस्ती करणे भाग पडते.
योग्य गुणवत्ता नियंत्रण पद्धत असेल तर विकलेल्या गाड्या परत मागवण्याची वेळ येत नाही. ग्राहकांच्या तक्रारी नियंत्रणात ठेवता येतात. ग्राहक गमावण्याची वेळ येत नाही आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ब्रँडचे नाव होते व त्याबद्दल विश्वास निर्माण होतो. परिणामत: ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करणारी उच्च-गुणवत्तेची उत्पादने तयार करण्याची क्षमता राखून उत्पादनाची प्रतिष्ठा वाढवणे शक्य होते. औद्याोगिक क्रांती (इंडस्ट्री) ४.० च्या अनुषंगाने येणाऱ्या तंत्रज्ञानाने गुणवत्ता कशी राखली जाऊ शकते हे पाहू या…
हेही वाचा: कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्मार्ट वाहन
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयाने गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेत क्रांती घडवून आणली आहे. मानवी क्षमतांच्या पलीकडे असलेल्या तपशिलांचे अगदी बारकाईने निरीक्षण करण्याचे काम कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान, विशेषत: यांत्रिक दृष्टी, संवर्धक आदींचा समावेश असलेल्या प्रणाली सहजपणे करतात. या प्रणाली अगदी लहान दोष शोधू शकतात आणि गुणवत्तेच्या निकषांवर योग्य अशाच वाहनांच्या निर्मितीची हमी देतात.
निर्मिती दोषांचे वेळीच उच्चाटन करून उत्तम गुणवत्ता राखणे हा सध्याच्या वाहन उद्योगातील यशासाठी महत्त्वाचा घटक आहे. तथापि, नव नवी वैशिष्ट्ये, नव नवे तंत्रज्ञान असणाऱ्या आधुनिक वाहनांचे उत्पादन आव्हानात्मक झाले आहे. यात एखादी छोटीशी चूकदेखील अत्यंत महाग ठरू शकते आणि म्हणूनच मानवी नियंत्रणापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याची अधिक गरज भासते.
हेही वाचा: कुतूहल : वाहनउद्योगातील कृत्रिम बुद्धिमत्तेची भरारी
कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारी गुणवत्ता तपास प्रणाली वाहनांची बारकाईने छाननी करणे, मानवी निरीक्षकांकडून निसटू शकतील असे दोष/ विसंगती शोधते. ही प्रणाली ही सर्व कामे लीलया करू शकते, त्यामुळे वेळेची आणि पैशाची बचत होऊ शकते. उत्तम प्रतीचे संवेदक आणि कॅमेरा यांच्याद्वारे इंजिनातील विसंगती शोधणे, बदललेले तापमान किंवा आवाज समजून घेणे, त्यातून काय बिघाड होण्याची संभावना आहे याचा अंदाज बांधणे इत्यादीमुळे गाड्यांची योग्य देखभाल करणे, आयुष्यमान वाढवणे अधिक सुकर होऊ लागले आहे. एकंदरच आधुनिक वाहन उद्योगासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे विकसित गुणवत्ता नियंत्रण प्रणाली ही गरज ठरू लागली आहे.
कौस्तुभ जोशी
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org