समजा आपल्याला विशिष्ट घनता, ठरावीक चुंबकीय गुणधर्म, चटकन तयार करता येणारा, हलका आणि स्वस्त असा पदार्थ हवा आहे. तो तसा निर्मिणे हा विचार दोन दशकांपूर्वी कल्पनाविलास म्हणून सोडून दिला जाई. आज मात्र मानवाने कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने विशिष्ट गुणयुक्त, जणू सांगाल तो, पदार्थ बनवण्याची क्षमता विकसित करायला सुरुवात केली आहे. इच्छित पदार्थातील घटक वेगवेगळे तयार करून त्यांना जोडता किंवा त्यांचे मिश्रण करता येऊ शकते. अधिक ताकदवान, प्रचंड उष्णता सहन करणारे पदार्थ तयार करणे नजीकच्या भविष्यकाळात शक्य होईल.
हेही वाचा >>> कुतूहल – शास्त्रीय संशोधन : विश्लेषणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रदूषण न करणारे आणि सतत नैसर्गिकरीत्या तयार होणारे इंधन आवश्यक आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, लाटांपासून ऊर्जा निर्मिती, जैवइंधन यांचा विकास होत आहे. मात्र अशी ऊर्जा निर्माण करणे आणि साठवणे महाग आहे. ऊर्जा निर्मितीचे संच, ते स्थापित करणे, असे भांडवली खर्च खूप जास्त आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित यंत्रे स्वस्तात चांगल्या गुणवत्तेची ऊर्जा निर्मिती संयंत्रे तयार करतील. अधिक कार्यक्षम पवन ऊर्जा निर्मिती संच अधिक स्वस्त आणि अधिक कार्यक्षम पदार्थ बनवत आहेत. लाटांपासून ऊर्जा निर्मिती करणारे संयंत्र समुद्रामध्ये उभारून मोठ्या प्रमाणात ऊर्जा मिळवता येते. कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे अधिक कार्यक्षम, किफायतशीर संयंत्र करून भारतातही लाटांपासून ऊर्जा निर्मिती शक्य आहे.
नूतनीकरणक्षम ऊर्जा निर्मिती जिथे शक्य आहे तिथे करावी लागते. ती ऊर्जा मुख्य वीज जाळ्यांमध्ये आणणे हे किचकट, पण आवश्यक असते. कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली त्यासाठी सुयोग्य पद्धत तयार करून प्रतिक्षणी विद्युत जाळ्याची कार्यक्षमता वाढवते. येत्या पाच-दहा वर्षांत विविध प्रकारच्या ऊर्जास्राोतांतून वीज तयार करून ती एकत्रित वापरायची व्यवस्था असणारी स्मार्ट ग्रिड जागोजागी दिसतील.
कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे मानवाला उपकारक शास्त्रीय संशोधन कसे आणि किती प्रकाराने केले जात आहे याची वानगीदाखल ही दोन, तीन उदाहरणे दिली आहेत. शिवाय रसायनशास्त्र, औषध निर्माणशास्त्र यात रेण्वीय रचना सुस्पष्टपणे समजणे, क्रियांवरील नियंत्रण सुयोग्य राखणे, नवे रेणू तयार करणे शक्य होऊन यात वेगाने प्रगती होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने प्रत्येक ज्ञानशाखेतील संशोधन अधिक वेगात पुढे जात आहे. त्या संशोधनाने मानवजात आणि पृथ्वीवरील सजीव, निर्जीव सर्वच अधिक विकसित होतील, समृद्ध होतील.
प्रा किरण बर्वे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org