दक्षिण आशियातील प्राचीन शेतीपद्धतींबाबत संशोधन व प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने १९९४ साली सिकंदराबाद येथे ‘एशियन अॅग्री-हिस्ट्री फाऊंडेशन ट्रस्ट’ स्थापन झाला. डॉ. यशवंत नेने, एस्. एम्. निगम, पी. एम्. तांबोळी अशा आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांनी या स्वयंसेवी संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
गेली १७ वष्रे संस्थेतर्फे ‘एशियन अॅग्री-हिस्ट्री’ हे नियतकालिक प्रकाशित केले जात आहे. शेतीसंबंधित अभियांत्रिकी, खगोलशास्त्र, वानिकीशास्त्र, भूगोल, पशुपालन, पीकवैविध्य, पीकमशागत, कापणी, मळणी, आंतरमशागत, सिंचन, पीक संरक्षण, बियाणे, पेरणी, माती, उपयुक्त वनस्पती, स्त्रिया व शेती अशा अनेक विषयांवर लेख यात प्रकाशित केले जातात.
भारतीय शेतीबाबतचे ज्ञान बहुतांशी संस्कृत किंवा पíशयन दुर्मीळ ग्रंथांमध्ये पाहायला मिळते. नव्या पिढीला त्यांचा परिचय होण्यासाठी संस्थेने त्यांचे इंग्रजीत अनुवाद केले. ऑक्सफोर्ड येथील बॉडलेन ग्रंथालयातील मूळ ‘वृक्षायुर्वेद’ ग्रंथाची फिल्म करून त्याचा अनुवाद इंग्रजी, मराठी, िहदी, तेलगू, कन्नड, तमीळ या भाषांत करून आपल्या कार्याची सुरुवात संस्थेने केली. संस्कृतमधील कृषी पराशर, कश्यपीय कृषी सूक्ती, विश्ववल्लभ, कृषीशासनम्, उपवनविनोद, मृगपक्षीशास्त्र, कृषीगीता (मल्ल्याळम), लोकोपकार (कन्नड), नुस्खा दर फन्नी-फलाहत (पíशयन), भारतीय शेतीचा वारसा, प्राचीन व मध्ययुगीन भारतीय शेती (इंग्रजी) अशा अनेक पुस्तकांचेही अनुवाद संस्थेने केले. प्राचीन शेतीविषयक साहित्याचे संदर्भ ग्रंथालय संस्थेने तयार केले.
भारतीय शेतीचा वारसा, प्राचीन व आधुनिक शेतीपद्धती यांचा मेळ या विषयांवर संस्था देशभर व्याख्याने, परिषदा, कार्यशाळा, परिसंवाद आयोजित करते. ईशान्येकडील राज्यांतील चहाच्या मळ्यांत तर आता यामुळे परंपरागत पद्धतीने शेती केली जात आहे. संस्थेच्या प्रयत्नांमुळे २००४ मध्ये ‘प्राचीन भारतीय शेती’ या विषयाचा समावेश काही शेतकी विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात करण्यात आला. शेतकऱ्यांना प्राचीन शेतीतंत्रांबाबत ओळख करून देण्यासाठी संस्थेने शास्त्रज्ञांना आíथक आणि तांत्रिक पाठबळ पुरविले.
आज उदयपूर, पंतनगर, सिलिगुडी येथे संस्थेच्या शाखा कार्यरत आहेत. अशा शाखांद्वारे त्या परिसरातील प्राचीन लिपींचा शोध घेणे, भारतातील सर्व विद्यापीठांत प्राचीन शेतीविषयक अभ्यासक्रमाचा समावेश करणे, पदव्युत्तर शिष्यवृत्त्या देणे, वृक्षायुर्वेद संशोधन केंद्रे स्थापन करणे अशा गोष्टींचा पाठपुरावा संस्था करत आहे.
प्रतिनिधी मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
आजचे महाराष्ट्रसारस्वत : १२ फेब्रुवारी
१९४३ > कवी सतीश हरिश्चंद्र काळसेकर यांचा जन्म. त्यांचे ‘इंद्रियोपनिषद’, ‘साक्षात’, ‘विलंबित’ आदी काव्यसंग्रह प्रकाशित झाले, तसेच ‘कविता लेनिनसाठी’ या लेनिनवरील जगभरच्या विविध भाषांतील कवितांच्या अनुवाद-संग्रहाचे संपादन त्यांनी केले. लोकवाङ्मय गृहाच्या ग्रंथप्रसार कार्याशी काळसेकर संबंधित आहेत. लघु नियतकालिकांच्या चळवळीत आजही राहून ते ‘आपले वाङ्मय वृत्त’ हे लोकवाङ्मय गृहाचे मासिक ते चालवतात. याच मासिकातील लेखांचे ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ हे संकलनही प्रसिद्ध झाले आहे.
१९५० > संस्कृत व्याकरणशास्त्राचे गाढे अभ्यासक नारायण दाजीबा वाडेगावकर यांचे निधन. ‘परिभाषेन्दुशेखर’ हा ग्रंथ त्यांनी लिहिला.
१९९८ > ‘आमच्यापुढे दाही दिशा लक्ष्मणरेषा.. ओलांडाव्याच लागतात, रावणांना सामोरे जावेच लागते’ अशा शब्दांत आजच्या स्त्रीची वेदना मांडणाऱ्या, स्त्रीच्या अंतर्मुख भावनांना वाचा देणाऱ्या कवयित्री पद्मा ऊर्फ पद्मा गोळे यांचे निधन. ‘प्रीतिपथावर’, ‘नीहार’, ‘स्वप्नजा’, ‘आकाशवेडी’ हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. दोन पुरुषपात्रविरहीत नाटके व काही बालनाटिकाही त्यांनी लिहिल्या होत्या.
संजय वझरेकर
वॉर अँड पीस : जंत
आमचे रुग्णालयात काळोखे नावाचे एक शेतकरी कृमींच्या घोर व्यथेकरिता एक दिवस प्रवेशित झाले. त्यांचा सर्वच्या सर्व मळ हा कृमींचाच. असे हजारो बारीक बारीक कृमी नित्य पडत असल्यामुळे काळोखे हैराण होते. मी व आमचे गुरुजी वैद्यराज पराडकर यांनी बराच विचार केला. प्रकृतिविघात करण्याकरिता म्हणजे जंत कृमींचे मूळ कारण हटविण्याकरिता, पक्वाशयाच्या शोधनाचे कठोर उपाय केले. कडुनिंब पानांचा स्वरस व गोमूत्र असे एनिमे शंभरचे आसपास दिल्यावर जंतांचे प्रमाण नगण्य राहिले.
जंत किंवा कृमी विविध प्रकारचे असतात. सुतासारख्या बारीक कृमीपासून नाका-तोंडातून निघणाऱ्या मोठय़ा जंतांपर्यंत अनेक प्रकार आहेत. काही जंत संपूर्ण बाहेर न पडता तुकडय़ा तुकडय़ाने येतात. लहान मुलांच्या बाबतीत चिमटय़ाने नाका-तोंडातून किंवा परसाकडच्या जागेतून ओढून काढावे लागतात. अनेक वेळा कोणत्याही रोगाचे कारण समजत नाही. त्यावेळेस जंताच्या औषधाची लहानशी पुडी मोठे काम करून जाते. पोटदुखी, अॅपेंडिक्स अॅटॅक, उलटी, कठीण मलप्रवृत्ती, ताप, जुलाब, कावीळ, पांथरी वाढणे, अनपत्यता याच्या मागे एक वा अनेक जंत कारणीभूत असू शकतात. जंत वा कृमी या विकारांची अनेक कारणे आहेत. अशुद्ध, गढूळ पाणी, अस्वच्छ राहणी, नखातील माती अशा कारणांशिवाय शंकास्पद खवा, मिठाई, शिळे व आंबवलेले अन्न, खूप गोड पदार्थ, दूध व केळीयुक्त शिकरण, मासे, मांसाहार, खराब दर्जाचा गूळ; रात्रौ नित्य दही खाणे. विविध प्रकार असूनही लक्षणांवरून हे विकार सहजपणे ओळखता येतात. जीभेवरचे ठिपके, नाक, गुदभाग खाजवणे, पालथे झोपणे, शय्यामूत्र, तीव्र मलावरोध, विटाळ न येणे, मळमळणे, कोडाचे डाग, त्वचेचे विकार, झोपेत दात खाणे, वजन न वाढणे, स्थौल्य, फिट्स अशी अनेक लक्षणे असतात. आरोग्यवर्धिनी, कृमीनाशक प्र. ३ गोळ्या दोन वेळा; रात्री कपिलादिवटी; दोन्ही जेवणानंतर विंडगारिष्ट किंवा सातापाकाढा ही औषधे वापरा, अनुभवा.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. : शेत आणि शेतकरी
हृदयदाहाचा (myocarditis) एक रुग्ण आम्हाला दाखवण्यात आला; तेव्हा मी मेडिकलच्या चौथ्या वर्षांत होतो. आपल्याला अधूनमधून ताप येतो तेव्हा (viral fever)म्हणून त्याचे निदान केले जाते. विश्रांती घ्या म्हणजे शरीरातील प्रतिकारशक्ती जपा मग हळूहळू बरे व्हाल असे आपल्याला सांगण्यात येते. आपण हेळसांड केली आणि उगीचच औषधे घेतली तर ताप जायचा तेव्हाच जातो फक्त या औषधामुळे आपले पोट बिघडते. या हृदयदाहाच्या रुग्णाच्या उपचारांबद्दल त्या दिवशीचे शिक्षक आम्हाला म्हणाले होते : याला संपूर्ण विश्रांतीची गरज आहे. याला उत्तेजनार्थ औषधे देणे म्हणजे मरगळलेल्या घोडय़ाला चाबकाने झोडपणे असा प्रकार होईल. फटक्यांच्या वेदनांमुळे हा कदाचित धडपडून चालू लागेल आणि मरेल.
या दृष्टांतामुळे मिळालेला धडा पानभर मजकुरापेक्षा जास्त लागू पडला होता. मायकल फॅरेडे या वैज्ञानिकाचे नाव सुपरिचित आहे. याने विद्युत चुंबकीय क्षेत्राचा शोध लावला. म्हणजे विद्युत प्रवाह चालू असताना त्याच्या अवतीभोवती चुंबकीय क्षेत्र तयार होते हा तो शोध. याच्या उलट जर एखाद्या चुंबकाला जर तुम्ही गती दिलीत तर त्याच्या भोवती विद्युत प्रवाह निर्माण होतो. त्या काळात आपल्या अवतीभोवती असलेली रिकामी जागा खरोखरच रिकामी असते असा समज होता. फॅरेडे तेव्हा म्हणाला होता की ‘एवढी आश्चर्यजनक आणि रम्य अशी ही पोकळी आहे ती रिकामी कशी असू शकेल.’ एका द्रष्टय़ा माणसाचे ते विधान होते आणि ते खूप काही सांगून गेले. फॅरेडे होता Book Binder पण पुस्तके बांधून झाल्यावर तो ती वाचत बसत असे अशीही त्याच्याबद्दलची कथा सांगतात. विद्युत चुंबकीय क्षेत्र ही मराठीतील रचना हल्लीची, त्या क्षेत्राला इंग्रजीत Field म्हणतात. हा क्षेत्र शब्द गीतेत तेराव्या अध्यायात पहिल्या दोन श्लोकांतच आला आहे. श्लोकावर ज्ञानेश्वर निरूपण करताना म्हणतात,‘या क्षेत्राची। खऱ्या अर्थाने जाण । त्याला म्हणतात। ज्ञान’
मी आहे ,मी स्वत:ला जाणतो मला एक क्षेत्र आहे.. ते माझ्या कुटुंबाशी निगडित आहे. कुटुंबात प्रभाव क्षेत्रे आहेत ती एकमेकांना कशी प्रभावित करतात यावर त्या कुटुंबाचे मूल्यमापन होते. अशी अनेक कुटुंबे आहेत. त्यांची प्रभावक्षेत्रे आहेत त्यावरून समाजाचे निरीक्षण होते. असे अनेक समाज आहेत. त्यांचे प्रांत आहेत, मग देश आहेत, मग खंड, मग पृथ्वीवर आणखी सजीव आहेत, त्यांची क्षेत्रे आहेत, ते पशुपक्षी आणि वृक्षवल्लीरी आपले सोयरे आहेत की आपण त्यांचे वैरी बनून या क्षेत्राचा नाश आरंभला आहे? पृथ्वीला क्षेत्र मानले तर त्यात निसर्गाने खनिजे निर्माण केली आहेत. त्या क्षेत्रांचे घबाड आपण लुबाडायला निघालो आहोत का जेणेकरून स्वार्थीपणे आपण आपले जीवन चंगळवादी बनवण्याचा घाट घातला आहे.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com