अणुऊर्जेला प्राधान्य देण्यासाठी १९४८ साली भारत सरकारने ‘अणुऊर्जा आयोगा’ची स्थापना केली. अणुऊर्जेसाठी लागणाऱ्या उपयुक्त खनिजांचे अन्वेषण आणि विकास करणे हा त्यामागील एक प्रमुख उद्देश होता. त्यासाठी २९ जुलै १९४९ रोजी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) या विभागाची दुर्मीळ खनिजे सर्वेक्षण शाखा (रेअर मिनरल्स सर्व्हे युनिट) अणुऊर्जा आयोगाच्या नियंत्रणाखाली आणण्यात आली. त्या शाखेच्या प्रमुखपदी प्रख्यात भूवैज्ञानिक आणि भारत सरकारचे भूवैज्ञानिक सल्लागार डॉ. दाराशॉ नोशेरवान वाडिया यांची नियुक्ती करण्यात आली.

आता त्या शाखेला ‘परमाणू खनिज निदेशालय’ (अॅटॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्प्लोरेशन अँड रिसर्च, एएमडी) या नावाने ओळखले जाते. युरेनियम, थोरियम यांच्या खनिजांचे आणि बेरिलियम, लिथियम, नायोबियम, टँटालम, झिरकोनियम, दुर्मीळ मृत्तिका (रेअर अर्थ्स) इत्यादी मूलद्रव्यांच्या खनिजांचे अन्वेषण (एक्स्प्लोरेशन) आणि विकास करण्याची जबाबदारी या निदेशालयाकडे आहे.

हेही वाचा :कुतूहल : टुंड्रा प्रदेश

झारखंडच्या सिंहभूम पट्ट्यामध्ये ‘परमाणू खनिज निदेशालय’, ‘भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण’ आणि दामोदर घाटी आयोग (दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन) या तीन विभागांच्या संयुक्त चमूने युरेनियमचे अन्वेषण १९५० मध्ये सुरू केले. भारतातील युरेनियमच्या साठ्याचा पहिला शोध याच पट्ट्यातील जादूगोडा येथे १९५१ मध्ये लागला. त्यापाठोपाठ नरवापहाड आणि भाटीन येथील साठ्यांचा शोध लागला. हळूहळू अन्वेषणचे कार्यक्षेत्र देशभर पसरले.

सुरुवातीला १७ भूवैज्ञानिक आणि सात तंत्रज्ञ असलेल्या परमाणू खनिज निदेशालयात आता ५०० वैज्ञानिक आणि जवळपास दोन हजार ४०० कर्मचारी कार्यरत आहेत. निदेशालयाचे मुख्यालय हैदराबादला असून सात क्षेत्रीय विभाग आणि सहा विशिष्ट अन्वेषण गट यांच्यामार्फत खनिजांचे अन्वेषण केले जाते. याखेरीज परमाणू खनिज निदेशालयात भौतिकविज्ञान, रसायनविज्ञान, खनिजविज्ञान, शिलाविज्ञान, क्ष-किरण विवर्तन (एक्स-रे डिफ्रॅक्शन), भूकालानुक्रम (जिओक्रोनॉलॉजी), स्थिर समस्थानिक (स्टेबल आयसोटोप) आणि खनिज प्रक्रमण (मिनरल प्रोसेसिंग) अशा अनेक अद्यायावत आणि उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा आहेत.

हेही वाचा :कुतूहल : एकपेशीय सजीवांचे जीवाश्म

२०२४ मध्ये परमाणू खनिज निदेशालयाने हीरक महोत्सव साजरा केला. या कालावधीत युरेनियमच्या लहानमोठ्या ४७ साठ्यांचा शोध लावला गेला. त्यातले बहुसंख्य आंध्र प्रदेश, झारखंड, मेघालय आणि राजस्थान या राज्यांमध्ये आहेत. त्यांपैकी आठ साठ्यांमधून युरेनियम ऑक्साइड मिळविले जाते. शिवाय थोरियम, झिरकोनियम, इतर दुर्मीळ मूलद्रव्ये, यांच्याही खनिजांचे साठे शोधण्यात आले आहेत. विशेष म्हणजे भारत हा थोरियमच्या बाबतीत अतिशय समृद्ध आहे. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमामध्ये परमाणू खनिज निदेशालयाचे खूप मोठे योगदान आहे.

अरविंद आवटी

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org

Story img Loader