‘ऑन दि ओरिजिन ऑफ स्पिसीज..’ हे पुस्तक एच.एम.एस. बीगल या जहाजाच्या सफरीद्वारे जन्माला आलेल्या, डार्विनच्या उत्क्रांतीवादावरचे पुस्तक आहे. या पुस्तकात चार्ल्स डार्विनने आपल्या १९३१ ते १८३६ या काळातील मोहिमेतील निरीक्षणांची माहिती देऊन आपला उत्क्रांतीवाद मांडला आहे. चार्ल्स डार्विन आपल्या सफरीवरून १८३६ साली परत आला. मात्र त्याचे हे पुस्तक प्रसिद्ध होण्यासाठी त्यानंतरची २३ वर्षे जावी लागली. चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडायच्या आधीही सजीवांची निर्मिती उत्क्रांतीद्वारे झाली असल्याची मते व्यक्त केली गेली होती. जियाँ-बाप्टिस्ट लामार्क तसेच चार्ल्स डार्विनचे आजोबा इरॅस्मस डार्विन यांनीसुद्धा उत्क्रांतीवर लिखाण केले होते. (अर्थात हे सिद्धांत चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतापेक्षा खूपच वेगळे होते.) म्हणजे उत्क्रांतीवादावर चर्चा अगोदरच सुरू झाली. इतकेच नव्हे तर आपल्या सिद्धांताबद्दल डार्विनचे अनेक परिचितांशी बोलणेही झाले होते. तरीही डार्विन आपल्या सिद्धांताला प्रसिद्धी देत नव्हता. डार्विनला आपला सिद्धांत शक्य तितका निर्दोष करायचा असल्याने, या सिद्धांतासंबंधीचे डार्विनचे संशोधन या काळातही चालूच होते.
इ.स. १८५६ सालच्या एप्रिल महिन्यात डार्विनने आपला सिद्धांत प्रसिद्ध करण्यासाठी ‘नॅचरल सिलेक्शन’ या नावाचे पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. या पुस्तकाचे लिखाण चालू असतानाच, इ.स. १८५८ सालच्या मध्यावर त्याला एक पत्र आले. हे पत्र डार्वनिच्या थोडय़ा फार संपर्कात असणाऱ्या, आल्फ्रेड वॉलेस या मलाय बेटांवर संशोधन करणाऱ्या, एका इंग्लिश संशोधकाचे होते. त्यात त्याने काहीशा अशाच सिद्धांताचा उल्लेख होता. आता मोठा प्रश्न आला होता तो शोधाच्या श्रेयाचा! चार्ल्स डार्विन याने आपल्या सिद्धांतावर आतापर्यंत प्रचंड काम केले होते. त्यामुळे त्याचा सिद्धांतही प्रकाशित होणे गरजेचे होते. यावर उपाय म्हणून चार्ल्स डार्वनि आणि आल्फ्रेड वॉलेस या दोघांच्या सिद्धांतांच्या संक्षिप्त अहवालाचे वाचन लंडनच्या लिनियन सोसायटीच्या सभेत संयुक्तरीत्या करण्याचे ठरले. त्यानुसार दिनांक १ जुलै १८५८ रोजी लिनियन सोसायटीच्या सभेत दोन्ही अहवाल सादर केले गेले. त्यानंतर अखेर २२ नोव्हेंबर १८५९ रोजी, कालांतराने ऐतिहासिक ठरलेले डार्वनिचे हे पुस्तक ‘ऑन दि ओरिजिन ऑफ स्पिसीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध झाले.
– डॉ. नंदिनी नेरुरकर-देशमुख
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org