१९९७ साली वडिलांची झालेली हत्या, संशयातून आईला झालेला तुरुंगवास, नातलग आणि गावकऱ्यांचा बहिष्कार, उदरनिर्वाहासह तीन बहिणींची पडलेली जबाबदारी. अशा प्रतिकूल परिस्थितीत एका तरुणीने नाइलाजाने शिक्षण सोडून, एकटीने शेती करायला सुरुवात केली. आई-वडील शेतीची कामे करीत असल्यामुळे शेतीकामाचा अनुभव सुनंदा व तिच्या बहिणींना नव्हता. शेतीच्या कामासाठी एका युवकाला कामाला ठेवले होते, पण वाईट अनुभव आला. त्यामुळे औत जुंपणी, नांगरणी, मळणी, तोडणी या कामांसह शेतीमाल बाजारात पाठवण्यापर्यंतची सर्व कामे सुनंदाने तिच्या बहिणींच्या मदतीने केली. त्यांपकी काही कामे तर सुनंदाने दुरून बघून शिकून घेतली. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना २.२६ हेक्टर जमिनीवर संत्रे, चिकू, आंबा, सीताफळ इत्यादी फळझाडे लावली. खरीप हंगामात ज्वारी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग या मिश्रपिकांची तर रब्बी हंगामात गहू, आणि चण्याची लागवड केली. भाजीपाल्यामध्ये दरवर्षी लाखभर रुपयांचे कोबीचे उत्पादन घेतले जाते. त्याचबरोबर तुतीची लागवड करून रेशीम उत्पादनाचा जोडधंदा आहे.
सुनंदाने ठिबक आणि तुषार सिंचनाचा वापर केला तसेच स्थानिक कृषी अधिकाऱ्यांच्या मदतीने आमदार निधीतून मदत मिळवून शेतीतील कच्च्या विहिरीचे पक्के बांधकाम करून तिची साठवण क्षमता वाढवली.
शेतीतील तिच्या अनुभवाचा फायदा परिसरातील शेतकऱ्यांना मिळावा म्हणून ती करीत असलेल्या मार्गदर्शनाचा लाभ सुमारे २५० शेतकरी घेत आहेत. मिश्रपिकांचे फायदे आणि सेंद्रिय शेतीचे महत्त्व त्या शेतकऱ्यांना पटवून देतात. शासकीय शेती प्रशिक्षण शिबिरे त्यांच्या शेतात घेण्यात येतात, ही त्यांच्या कामाची पावती तर आहेच, पण त्याशिवाय हे विदर्भातील उदाहरण म्हणूनसुद्धा अधोरेखित करण्यासारखे आहे.
शेतीतील या कामासाठी सुनंदा यांना जिजामाता कृषिभूषण पुरस्कार, वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार, बळीराजा- अण्णासाहेब शिंदे पुरस्कार मिळाले आहेत.
फळे साठविण्यासाठी पॅकहाऊस, भाजीपाला पिकांसाठी शेडनेट, शक्यतो सेंद्रिय पद्धतीने शेती व शेततळय़ाच्या माध्यमातून मत्स्यशेती करण्याचे सुनंदा यांचे पुढील उद्दिष्ट असून विदर्भातील शेतकऱ्यांसमोर शाश्वत शेतीचा आदर्श ठेवण्याचा तिचा मानस आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा