अझरबैजानला लागून असलेल्या इराण, तुर्कस्थान आणि रशिया या एकेकाळी प्रबळ असलेल्या महासत्तांमुळे अझरबैजानी लोकांच्या संस्कृतीवर, जीवनशैलीवर त्यांचा मोठा प्रभाव पडलेला आहे. इ.स.पूर्व काळात अडीच शतके इथे पर्शिया म्हणजे इराणी राजसत्तेचा अंमल होता. या काळात हा प्रदेश सुरुवातीस इराणचाच एक भाग म्हणून उल्लेखिला जात असे. परंतु पुढे अझरबैजान असा याचा उल्लेख सुरू झाला. ११व्या शतकात हा प्रदेश तुर्कांच्या वर्चस्वाखाली गेला. ज्या तुर्की लोकांनी इस्लाम धर्म स्वीकारला, त्यांना त्या काळात तुर्कमान असे म्हटले जाई. आणि या तुर्कमानांनी सध्याचा अझरबैजानचा प्रदेश घेऊन तिथे इस्लामचा प्रसार केला. या प्रदेशातल्या बहुसंख्य लोकांनी तुर्कमानांचा सुन्नी पंथीय इस्लाम स्वीकारला. या लोकांचा उल्लेख तुर्कमान, तसेच अझेरी तुर्क असाही केला. १३ व्या आणि १४ व्या शतकात मंगोल टोळ्यांनी अझरबैजानी प्रदेशांवर सततचे हल्ले करून तेथील अनेक शहरे उद्धवस्त केली. १३८० ते १४०५ या काळात तैमुरलंग ऊर्फ टिमूर गुरकानी या तुर्की-मंगोल आक्रमकाच्या अंमलाखाली अझरबैजान होते. १५ व्या शतकात इराणी साम्राज्याच्या वर्चस्वाखाली गेलेले अझरबैजान पुढे १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत कधी इराणी, कधी रशियन तर कधी तुर्की आटोमान साम्राज्याचा भाग बनून राहिले. १८ व्या शतकातील सहा वर्षे इराणी सत्ताधारी नादरशाह याच्या राज्यक्षेत्रात अझरबैजान होते.

इ.स.१८२६ ते १८२८ अशी तीन वर्षे चाललेल्या रशिया-इराण युद्धात इराणचा निर्णायक पराभव होऊन या दोन्ही सत्तांमध्ये झालेल्या तहान्वये इराणी साम्राज्यातल्या अझरबैजानचा आणि अर्मेनियाचा काही प्रदेश रशियन साम्राज्याचा भाग बनला. यातील उत्तरेतील दोन तृतीयांश प्रदेश रशियाकडे आला तर दक्षिणेतला उर्वरित अझरबैजान इराणकडे राहिला. पुढे १८४८ साली अझरबैजानची राजधानी बाकु या शहराच्या जवळ तेलविहीर सापडली. ही सापडलेली तेलविहीर जगातली पहिली तेलविहीर समजली जाते. या काळात अझरबैजानमध्ये अर्मेनियन लोकही मोठ्या संख्येने स्थायिक होते. या प्रदेशातले मूळचे पुढे इस्लाम धर्म स्वीकारलेले अझरबैजानी आणि आर्मेनियन यांमध्ये वरचेवर दंगल, हाणामारी होत असे. मार्च १९१८ मध्ये या दोन समाजांमध्ये उसळलेल्या दंगलीत दहा हजार अर्मेनियन आणि दोन हजार अझरबैजानी लोकांचा बळी घेतला, ‘मार्च डेज’ या नावाने ही घटना प्रसिद्ध आहे. – सुनीत पोतनीस

sunitpotnis94@gmail.com