पूर्वज अफगाण असलेले प्रसिद्ध सूफी संत बाबा फरीद ऊर्फ गंज- ए- शक्कर हे त्यांच्या तपस्वी जीवनशैली, साध्या राहणीबद्दल विख्यात होते. सुफींची ओळख असलेली घोंगडी ते दिवसा वापरीत, तीच रात्री अंथरूण म्हणूनही वापरीत. त्यांच्या  कारकीर्दीत त्यांनी अनेक चमत्कार करून दाखवले, असे सांगितले जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘‘दिल्लीहून पाकपट्टण ऊर्फ अजोधन येथे जाताना ते फरीदकोट इथे थांबले. त्या काळात फरीदकोटचे नाव होते मोखलपूर. राजा मोखल याच्या किल्ल्याचे काही बांधकाम चालू होते. बांधकामावरच्या मुकादमाने तिथून जाणाऱ्या बाबा फरीद यांना मजूर समजून दगड आणि मातीची पाटी त्यांच्या डोक्यावर ठेवली आणि वाहून न्यायला सांगितली. पहिली पाटी वाहून नेल्यावर परत दुसरी पाटी त्यांना वाहायला सांगितली. आश्चर्य म्हणजे पुढच्या पाटय़ा बाबाच्या डोक्यावर ठेवल्यावर आपोआप वरचेवर तरंगत होत्या. त्या मुकादमाच्या हे लक्षात आल्यावर त्याने राजाला हे आश्चर्य सांगितले. राजाने तिथे आल्यावर बाबा फरीदना ओळखून त्यांची माफी मागितली आणि गावाचे नाव फरीदकोट केले.’’ अशी दंतकथा प्रसिद्ध आहे.

बाबा फरीद यांचे पंजाबी साहित्यात मोठे योगदान आहे. त्या काळात संस्कृत, अरबी, फारसी वगरे भाषा उच्च शिक्षितांसाठी आहेत असा समज असल्याने लोक त्या भाषांपासून दूर होते. म्हणून बाबांनी स्थानिक पंजाबीत काही सुधारणा करून त्यांचे काव्य पंजाबी भाषेत लिहिले. बाबांनी केलेल्या १३४ श्लोकरचना गुरू ग्रंथ साहेबमध्ये ‘सलोक फरीदजी’ या नावाने समाविष्ट केलेल्या आहेत. १९९८ साली पंजाब सरकारने फरीदकोट येथे ‘बाबा फरीद युनिव्हर्सटिी ऑफ हेल्थ सायन्सेस’ स्थापन केली आहे. बाबा फरीद यांचे वंशज सध्या उत्तर प्रदेशात बदायून आणि शेखूपूर येथे आहेत आणि ते फरीदी किंवा फारूखी हे उपनाव लावतात.

बाबा फरीदचा एक दोहा प्रसिद्ध आहे-

जो तं मारण मुक्कियाँ, उनां ना मारो धुम्म,

अपनडे घर जाईए, पर तिनां दे चुम्म।

कोणी आपल्याला लाथा गुद्दे मारले तरी त्याला पलटून मारू नका, त्याच्या पायांचे चुंबन घेऊन स्वतच्या घरचा रस्ता पकडा!

– सुनीत पोतनीस

sunitpotnis@rediffmail.com

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Baba farid