ख्वाजा कुतुबुद्दीन बख्तियार काकी या चिस्ती संप्रदायाच्या सूफी संतांचे उत्तराधिकारी फरीदुद्दीन ऊर्फ फरीदबाबा यांचे पूर्वज काबूलचा सुलतान फारुखशाह याच्या नात्यातले. त्यांच्या मुलतान परगण्यावर चंगेजखानाच्या आक्रमणामुळे त्यांच्या आजोबांनी काबूलहून आपल्या परिवारासह पंजाबात स्थलांतर केलं. बाबा फरीद यांचे मूळ नाव फरीद अल-दीन मसूद गंज ए शेखर. त्यांचा जन्म इ.स. ११७५ मध्ये मुलतानजवळच्या कोठेवाल येथला. मुलतानवर चंगेजखानाच्या झालेल्या आक्रमणामुळे फरिदच्या आजोबांनी आपल्या परिवारासह काबूलहून पंजाबात स्थलांतर केले. फरीदुद्दीन अनेक नावांनी प्रसिद्ध आहेत, त्यापैकी पाकपट्टणचे बाबा फरीद आणि गंज-ए-शक्कर ही नावे अधिक प्रचलित आहेत.

गंज-ए-शक्कर या नावामागे मोठी गमतीची आख्यायिका सांगितली जाते. फरीदच्या बालवयात त्यांना नमाज पढण्याची सवय लागावी म्हणून त्यांची आई नमाज पढण्याच्या जाजमाखाली साखर ठेवीत असे. एकदा आई साखर ठेवायला विसरली. आश्चर्य असे की नमाज पढून झाल्यावर जाजमाखालची साखर घेण्यासाठी ते उचलले तर आईने न ठेवताही त्यांना साखर सापडली. प्रत्यक्ष अल्लाहने ही साखर ठेवली अशी लोकांची श्रद्धा आहे आणि तेव्हापासून फरीदुद्दीनला गंज-ए-शक्कर ही उपाधी चिकटली! पुढच्या काळातही बाबा फरीदने अनेक चमत्कार करून दाखवले. बालवयात फरीद नेहमी उपवास करीत असे, कुराणाचे पठण करीत असे तसेच ‘समा’ म्हणजे ईश्वराचे स्तुतीपर गायन, भजन यांमध्ये भाग घेत असे.

फरीदुद्दीनने मुलतान येथे इस्लामी धार्मिक शिक्षण घेतल्यावर ते कंदहार येथे गेले. तिथे त्यांची भेट सूफी संत कुतुबुद्दीन बख्तियार काकी यांच्याशी होऊन त्यांनी फरीदुद्दीनना आपल्याबरोबर दिल्लीस नेऊन सूफी चिस्ती संप्रदायाची दीक्षा दिली. पुढे १२३७ मध्ये गुरू कुतुबुद्दीन यांच्या निधनानंतर फरीदुद्दीन यांनी पाकपट्टण (सध्या पाकिस्तानात) येथे आपले मुख्य कार्यस्थळ म्हणून निवडले. त्या काळात पाकपट्टणचे नाव अजोधन होते. तेव्हापासून ते पाकपट्टणचे बाबा फरीद म्हणून विख्यात झाले.

(पूर्वार्ध)

sunitpotnis@rediffmail.com

Story img Loader