भारतीय अॅग्रो-इंडस्ट्रीज फाऊंडेशन (बाएफ) या संस्थेची स्थापना डॉ. मणिभाई देसाई यांनी २४ ऑगस्ट १९६७ रोजी केली. स्वातंत्र्यपूर्व काळात मार्च १९४६ मध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधींनी पुण्याजवळील उरळीकांचन या गावात अल्पकाळासाठी वास्तव्य केले होते. या वेळी गांधीजींनी मणिभाई यांच्यावर निसर्गोपचार आश्रमाची जबाबदारी सोपविली होती. त्या दिवसापासून उरळीकांचन ही मणिभाईंची कर्मभूमी बनली.
महात्मा गांधींचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मणिभाईंनी वैयक्तिक मालमत्तेचा व कुटुंबाचा त्याग करून सामाजिक कार्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समíपत केले. दुर्बल घटकांचा स्थायी स्वरूपाचा विकास व्हावा व त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच पर्यावरण रक्षण व सामाजिक मूल्यांचे संवर्धन व्हावे, हा संस्था स्थापनेमागचा हेतू होता, यातूनच दारिद्रय़ व बेरोजगारीच्या प्रश्नावर उपाय शोधता येईल, याची मणिभाईंना खात्री होती.
मणिभाईंच्या मार्गदर्शनाखाली १९७० साली बाएफने पशुसंवर्धनाच्या कार्यक्रमातून संकरित गायींची संकल्पना रुजविली. त्यासाठी शेतकऱ्यांच्या दारातच सेवा उपलब्ध करून देणारी एक प्रभावी व विश्वासार्ह पद्धत सुरू केली. अधिक दूध उत्पादनासाठी संकरित गोपदास केंद्रातून संकरित गाई निर्माण केल्या. त्याला जोड म्हणून सधन पद्धतीने हिरव्या चाऱ्याची लागवड केली व जनावरांना सकस व समतोल आहार मिळण्यासाठी प्रयत्न केले. दुर्गम, कोरडवाहू, डोंगराळ भागातील गरीब आदिवासींच्या निकृष्ट जमिनीवर शेती- वृक्ष- फळझाडे (वाडी कार्यक्रम) व पशुधन यांच्यावर आधारित एकात्मक शेतीप्रणाली बाएफने राबविली. वाडी कार्यक्रमातून दीड लाखाहून अधिक गरीब आदिवासींना शाश्वत उत्पन्नाचे साधन मिळाले. या उपक्रमाला पाणलोट विकासाचीही जोड दिली. जलसंधारण तसेच वृक्षशेती यांच्या समन्वयातून अल्पभूधारक कुटुंबांनाही पीक-उत्पादनवाढीचा लाभ मिळाला.
बाएफच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून मिळालेल्या ज्ञानामुळे अनेक ग्रामीण युवकांना उपजीविकेचे साधन मिळाले. महिलांनाही बाएफच्या कार्यक्रमांमुळे मोठा आधार मिळाला. महिलांचे स्वयंसहायता गट तयार करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता येईल, या दृष्टीने बाएफने प्रयत्न केले.
जे देखे रवी.. -भ्रमाचा लोलक
पावसाळ्याच्या सुरुवातीला रानावनात कारवीला निळ्या रंगाची फुले येतात. कारवी ही वनस्पतीची जात जर जगायची असेल तर हा निळा रंग फार महत्त्वाचा ठरतो. कारण मधमाश्यांना निळाच रंग प्रामुख्याने दिसतो. या निळ्या रंगाकडे या माश्या आकर्षित होतात. कारण त्या फुलातला मध हे त्यांचे खाद्य असते. पण अनाहुतपणे त्या फुलातले पुंकेसर आणि स्त्री केसर या मधमाश्यांबरोबर सर्वत्र विखरतात, काही एकत्र येतात आणि नवी कारवीची झाडे जन्म घेतात, त्यांनाही निळी फुले येणार असतात. अर्थात प्रकाशाला रंग नसतो. तो जेव्हा परावर्तित होतो तेव्हा कशावरून परावर्तित होतो यावर रंग ठरतो. प्रकाश रंगहीन (पांढरा) असतो हे न्यूटनने दाखवले. त्यानेच लोलक मध्ये धरून सातरंगाचे इंद्रधनुष्य इथे पृथ्वीवर करून दाखवले. आकाशातले इंद्रधनुष्य निर्माण होण्यासाठी वातावरणातले पाण्याचे कण लोलक ठरवतात. प्रकाश हा चैतन्याचा एक प्रकार आहे. या चैतन्याच्या अनेक गमती आहेत. घडय़ाळाची किल्ली फिरवली की त्यातली स्प्रिंग आवळली जाते. त्याच्यातले चैतन्य वाढते आणि त्यामुळे घडय़ाळाचे वजनही वाढते. शेवटी ऊर्जा किंवा चैतन्य तुम्ही वस्तूत ठासून भरणार असलात तर त्यातल्या ऊर्जेचे थोडे तरी रूपांतर वजनात किंवा वस्तुमानात होते. आपण जेव्हा जेवतो तेव्हा आपण ऊर्जाच जेवतो. त्याला उष्मांक म्हणतात (calories). कारण आगगाडीत कोळसा घालतात तेव्हा तो जळल्यावर जशी उष्णता वाढते तसेच आपल्यातही होत असते. ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ म्हणतात. कारण विश्वातले सारे चैतन्य ब्रह्मातूनच आलेले असते.
हे ऋषिमुनींनी केलेले वक्तव्य प्रकट झाल्यावर आपण जे झोपलो ते हजार-पंधराशे वर्षे झोपलेलोच राहिलो आहोत. या ब्रह्मचैतन्याची सगळी स्वरूपे नंतर पाश्चिमात्यांनीच जगाला दाखविली. आपल्या व्यवहारी जीवनातली एकही वस्तू दाखवून द्यावी की जी पाश्चिमात्यांकडून आपण घेतलेली नाही, किंवा त्यांच्या तंत्रज्ञानावर आधारित नाही. ज्ञानेश्वरांची एक ओवी आहे. ती निराळ्या संदर्भात असली तरी ती इथे लागू पडते..
भ्रमाची असावी गादी। त्यावर झोकून द्यावी।
तेव्हा पडतात स्वप्ने। तीच वाटतात खरी।। ..भारतभूमीतल्या आपल्या पूर्वजांना सगळे माहीत होते असा तो भ्रम आहे. अर्थात कोणे एकेकाळी आपल्यात हुशार माणसे होऊन गेली हे तर खरे आहेच.
आपले त्या काळात जे झाले असणार तेच आता पाश्चिमात्यांचे होऊ घातले आहे. विज्ञानामुळे (आणि त्यात धंदा आलाच) निर्माण होऊ शकलेली सुखलोलुपता निखळ जिज्ञासेच्या पोटावर पाय देत आहे. अध्र्या हळकुंडाने पिवळे होण्यापाठोपाठ गर्वहरणही ओघानेच येते. माझ्या गर्वहरणाची कथा पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – डोळ्यांचे विकार- ४
१) डोळ्याची लाली : प्रवाळ, कामदुधा प्र. ३ गोळ्या दोन वेळा, मौक्तिक भस्म एक ग्रॅम एक वेळेस घ्यावे. सकाळी उपळसरी चूर्ण अर्धा चमचा घ्यावे. तळपायास शतधौत घृत लावावे. डोळ्याच्या भोवती बाहेरून चंदनखोड गंध किंवा दशांगलेपाचा पातळ लेप पुन: पुन्हा लावावा. २) रांजणवाडी : वरीलप्रमाणेच उपचार करावे. रात्री झोपताना योगवाही त्रिफळा चूर्ण १ चमचा घ्यावे. काळ्या मनुका किमान ३०, स्वच्छ धुवून बिया काढून खाव्या. काळा चष्मा लावावा. डोळ्याला विश्रांती द्यावी. टीव्ही वा बारीक वाचन टाळावे. ३) डोळ्यातून पाणी येणे : घरी केलेल्या लोण्याच्या तुपाचे २ थेंब पातळ करून डोळ्यात टाकावे. आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, नेत्ररक्षावटी प्र. ३, सुंठ पाव चमचा रसायन चूर्ण १चमचा २ वेळा घ्यावे. कृश व्यक्तीने महात्रफल्यघृत दोन चमचे दोन वेळा घ्यावे. ४) डोळे येणे : दारुहळदीची साल १० ग्रॅम एक कप पाण्यात उकळावी. आटवून अष्टमांश उरवावी काळजीपूर्वक गाळून गार झाल्यावर डोळ्यात दोन दोन थेंब पुन: पुन्हा टाकावे. किंवा बोरीक पावडरचे उकळून गार केलेले पाणी नेत्रबिंदू डोळ्यात टाकावे. याकरिता ५ ग्रॅम बोरीक पावडर, १०० मिली पाणी एकत्र उकळून २० मि.ली. उरवून गाळून ५ मिलीच्या चार बाटल्या भराव्या. ५) डोळ्यातील खुपऱ्या, खाज व पूं : डोळ्यात खात्रीचा मध २ थेंब टाकावा, थोडे झोंबते, ते सहन करावे, आरोग्यवर्धिनी, चंद्रप्रभा, नेत्ररक्षावटी, रसायनचूर्ण सकाळ सायंकाळ व रात्री योगवाही त्रिफळा चूर्ण घ्यावे. शेवग्याची ताजी पाने मिळाल्यास स्वच्छ धुवून त्यांचा रस काळजीपूर्वक काढावा. असा रस व मध प्रत्येकी २ थेंब मिश्रण डोळ्यात टाकावे. चांगले झोंबते. पण नंतर बरे वाटते. ६) लवकर चष्मा लावणे- पुरेशा उजेडातच वाचावे, उजेड मागून पुढे पडावा. आरोग्यवर्धिनी ३ गोळ्या, पाव चमचा सुंठचूर्णाबरोबर व महात्रफल घृताबरोबर दोन वेळा घ्याव्या. रात्री योगवाही त्रिफळा एक चमचा तूप मधाच्या मिश्रणाबरोबर घ्यावे. सुरवारी हिरडय़ाच्या मधात उगाळून नेत्रांजन करावे. शीर्षांसन करू नये. सूर्यनमस्कार जरुर घालावे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – १ एप्रिल
१८८९ > संस्कृत साहित्य, ज्योतिषशास्त्र, पाश्चात्य तत्त्वज्ञान आदी विषयांचे अभ्यासक, लेखक दाजी नागेश आपटे यांचा जन्म. त्यांचा ‘नरकाचा दरबार’ हा लेख छापल्याने ‘भाला’कार भोपटकरांना कारावास घडला. त्यानंतर राजकीय लेखन सोडून देऊन आपटे यांनी ‘सुधारणा आणि प्रगती’, ‘नीतिशास्त्र प्रबोध’, ‘सयाजीराव गायकवाड यांचे चरित्र’ तसेच ‘इंद्रधनुष्य’, ‘साहित्यप्रकाश’ हे स्फुटलेखसंग्रह लिहिले.
१९२७ > जैन साहित्याचे दालन मराठीत उजेडात आणणारे संशोधक डॉ. सुभाषचंद्र अक्कोळे यांचा जन्म. ‘प्राचीन मराठी जैन साहित्य’ या ग्रंथाबरोबर काही संपादने त्यांच्या नावावर आहेत.
१९५५ > गीतकार ग. दि. माडगूळकर आणि संगीतकार सुधीर फडके यांनी अजरामर केलेल्या ‘गीतरामायणा’चा पहिला भाग या दिवशी पुणे आकाशवाणीवरून प्रसारित.
२००० > कवयित्री संजीवनी मराठे यांचे निधन. काव्यसंजीवनी, राका, चित्रा, संसार, छाया, चंद्रफूल हे त्यांचे काव्यसंग्रह.
२००६ > ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ आणि ‘कोणास ठाऊक कसा, पण शाळेत गेला ससा’ ही गाणी लिहिणारे बालसाहित्यकार, चरित्रकार, कवी वसंत नारायण मंगळवेढेकर ऊर्फ ‘राजा मंगळवेढेकर’ यांचे निधन.
– संजय वझरेकर