बांधणी हा प्रकार गुजरात आणि राजस्थानमध्ये मुख्यत्वे तयार केला जातो. टाय अ‍ॅण्ड डाय पद्धतीचा अवलंब करून कापडाची रंगाई केली जाते. या तंत्राने रंगवले जाणारे कापड धाग्याने घट्टपणे अनेक ठिकाणी बांधले जाते आणि त्याच बांधलेल्या अवस्थेत त्याची रंगाई केली जाते. त्यामुळे ‘बांधणी’ ही अतिशय कौशल्याने काम करावी लागणारी पद्धत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी कापड बांधल्यामुळे लहरिया, मोथरा, एक डाळी आणि शिकारी या नावाने ओळखले जाणारे वेगवेगळे नमुने तयार होतात. बांधणी पद्धतीने रंगाई करताना प्रामुख्याने पिवळा, लाल, निळा, हिरवा आणि काळा हे रंग वापरतात. बांधणी पद्धतीच्या कापडावर साऱ्या प्रक्रिया पार पडल्यानंतर बुंदके, चौकटी, लाटा आणि पट्टे अशा भिन्न प्रकारचे डिझाइन दिसू लागते. बांधणीची रंगाई प्राधान्याने नसíगक रंगाने केली जाते, पण काही वेळा कृत्रिम रंगानीसुद्धा रंगाई केली जाते. बांधणीमध्ये गडद रंगांचा वापर होतो. फिके रंग वापरले जात नाहीत आणि पाश्र्वभूमी बहुतांश वेळा काळी/ लाल असते. बांधणीचे काम गुजरात राज्यातल्या कच्छ भागातील खत्री जमात करते. एक मीटर कापडावर हजारो छोटय़ा छोटय़ा गाठी असतात. स्थानिक कच्छी भाषेत ह्य़ाला ‘िभडी’ म्हणतात. आणि चार िभडी मिळून एकत्रितरीत्या ‘कडी’ म्हणून ओळखल्या जातात. रंगाईनंतर बांधलेल्या गाठी सोडल्यावर वेगळ्या प्रकारचे डिझाइन मिळते. सरतेशेवटी तयार झालेले उत्पादन खोंबी, घरचौला, पटोरी, चंद्रोखानी अशा नावाने ओळखले जाते.
गुजरात राज्यातील कच्छ प्रदेशातील भूज आणि मांडवी जिल्ह्य़ात भारतभरातील सर्वात चांगले बांधणीकाम होते, अशी ख्याती आहे. गुजरात राज्यातील सौराष्ट्र भागात बांधणीचे काम होते, पण कच्छमधील बांधणीपेक्षा ते वेगळ्या प्रकारे होते. राजस्थान प्रांतातसुद्धा बांधणीकाम केले जाते पण त्यामध्ये वापरले जाणारे डिझाइन आणि रंग कच्छ, सौराष्ट्रपेक्षा पूर्णपणे वेगळे असतात.
बांधणी किंवा बंधेजमध्ये पॅटर्नची रेलचेल असते. साडय़ांप्रमाणेच कुर्ता, सलवार, खमीज आणि चणिया-चोळीकरिता बांधणीचा वापर केला जातो. पूर्वी गुजरात, राजस्थानमध्ये सीमित असलेली बांधणीची मागणी आता भारतभर पसरलेली आहे.
दिलीप हेर्लेकर (मुंबई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
संस्थानांची बखर- संस्थान अक्कलकोट
सोलापूरहून ४० कि.मी.वर असलेले श्री स्वामी समर्थ यांचे निवासस्थान म्हणून प्रसिद्ध असलेले अक्कलकोट शहर ब्रिटिशराजच्या काळात संस्थानही होते, हे अनेकांना माहीत नसावे.
फतेहसिंह भोसले याने इ.स. १७१२ साली अक्कलकोटचे राज्य स्थापन केले. १७०८ मध्ये घडलेली एक घटना या राज्यस्थापनेस कारणीभूत ठरली. सतराव्या शतकात अक्कलकोट आणि आसपासचा प्रदेश अहमदनगरच्या निजामशाहीत होता. १७०७ साली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांची सुटका झाल्यावर ते साताऱ्यास येताना त्यांचा मुक्काम औरंगाबादजवळच्या पराड या गावी होता. त्या वेळी ताराबाई समर्थक सयाजी लोखंडे याने त्यांच्यावर हल्ला केला. शाहूच्या सनिकांनी सयाजीला ठार मारून त्याच्या साथीदारांना पळवून लावले. सयाजीच्या पत्नीने आपल्या मुलाला शाहू महाराजांच्या पायांवर घालून स्वत: तिच्या नवऱ्याच्या कृत्याबद्दल माफी मागितली आणि मुलाला संरक्षण देण्याची विनंती केली. महाराजांनी तिला माफ करून तिचा दहा वर्षांचा मुलगा राणोजी याचा सांभाळ करण्याचे वचन देऊन तिला पराड आणि शिवरी ही गावे इनाम दिली. त्यानंतर ताराबाई समर्थकांनी दोन वेळा हल्ला केला असताना राणोजीने हल्लेखोरांना पिटाळून महाराजांचे रक्षण केले. या गोष्टीमुळे प्रभावित होऊन शाहू महाराजांनी राणोजी लोखंडेला फतेहसिंह हे नाव देऊन त्याला दत्तक घेतले आणि आपल्या भोसले घराण्याचा सदस्य केले. राणोजी लोखंडेचा फतेहसिंह भोसले झाला! १७१२ साली फतेहसिंहाला शाहू महाराजांनी अक्कलकोट आसपासची चोवीस गावे जहागिरीत दिली. फतेहसिंहाने साताऱ्याच्या फौजेबरोबर कोल्हापूर, बुंदेलखंड, भागानगर आणि त्रिचनापल्ली येथील मोहिमांमध्ये भाग घेऊन आपले युद्धकौशल्य सिद्ध केले. फतेहसिंहाचा मृत्यू अक्कलकोट येथे १७६० साली झाला.
सुनीत पोतनीस -sunitpotnis@rediffmail.com