बार्नाकल्स हे संधिपाद संघातील आधाराला कायम चिकटून राहणारे सागरी सजीव आहेत. यांचे शरीर त्रिकोणी असून खालची बाजू जहाज किंवा खडक अशा पृष्ठभागाला घट्टपणे चिकटलेली असते. कधी कधी देवमाशाच्या शरीरालाही ते लिंपून राहतात. त्यांच्या दुसऱ्या मोकळय़ा बाजूवर मुख असते आणि त्यातून ते सिरी नावाचे पिसासारखे भासणारे मुखावायव बाहेर काढून अन्नग्रहण करीत असतात. यांच्या शरीरासभोवती कॅल्शियमपासून तयार झालेल्या सहा कडक प्लेट्स असतात. आणखी चार प्लेट्सने त्यांचे उघडझाप करणारे दार तयार झालेले असते. ओहोटीच्या वेळी ते हे दार घट्ट बंद करून स्वत:ला सुरक्षित ठेवतात, भरतीला मात्र पाण्याच्या प्रवाहातून अन्न गाळण्यास सुरुवात करतात. हे बार्नाकल्स झटदिशी वाळेल असे सिमेंटसारखे रसायन तयार करू शकतात. हा सर्वात शक्तिशाली नैसर्गिक गोंद आहे. पाच हजार पौंड/ चौरस इंच इतका ताण घेण्याची क्षमता या गोंदात असते.
दगडांवर किंवा जहाजांच्या बाह्य पृष्ठभागावर चिकटण्यासाठी ते प्रथिनांनी तयार झालेल्या दोऱ्यासारखे तंतू पृष्ठभागावर पसरवतात. हे तंतू जास्त जोर यावा यासाठी एकमेकात गुंतलेले असतात. त्यांना बायसस असे म्हटले जाते आणि ज्या पृष्ठभागावर त्यांना चिकटायचे असते, तेथे ते नवीन बहुवारिके तयार करतात. या तंतूंना लोहमिश्रित जटिल प्रथिने वापरून अधिकच शक्तिशाली केले जाते. या प्राण्यापासून कल्पना घेऊन पाण्याखाली देखील कार्य करेल अशा प्रकारचा रेशमी गोंद बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मॅसेच्युसेट्स टफ्टस् विद्यापीठातील फियोरेन्झो ओमेंट्टो नावाच्या शास्त्रज्ञाने जनुक अभियांत्रिकी तंत्राने बार्नाकल्समध्ये असणाऱ्या चिकटवण्याच्या गुणधर्मात संशोधन करून त्याचा वापर नव्या पद्धतीचा गोंद तयार करण्यासाठी केला. यासाठी त्यांनी रेशीम किडय़ातील रेशीम निर्मितीचे जनुक आणि बार्नाकल्समधील गोंद तयार करणारे जनुक वापरून रेशीमातील फिब्रोईन प्रथिन आणि पॉलीडोपामाइन बहुवारिक या दोहोंची जाळी तयार केली. याप्रमाणे तयार झालेल्या गोंदाला आयर्न क्लोराईडने उपचार करून त्यापासून जो गोंद तयार केला त्यात खूप जास्त तणाव (२.४ न्यूटन प्रती चौ. मि.मी) झेलण्याची क्षमता होती. या नवीन उत्पादनाची खासियत अशी की पेट्रोलियमपासून तयार करण्यात आलेल्या औद्योगिक गोंदापेक्षा त्याची क्षमता अधिक आहे.
एरवी बार्नाकल्सना ‘फाऊिलग सजीव’ म्हटले जाते. जहाजांच्या बाह्यपृष्ठभागावर चिकटलेली यांची प्रजा ओरबाडून काढताना खलाशांच्या नाकीनऊ येतात. हे सजीव प्रदूषणाचे निदर्शक असल्याचे देखील म्हटले जाते, असे असले तरी एवढा सक्षम गोंद देणारा हा निसर्गातला महत्त्वाचा स्रोत आहे.
– डॉ. नंदिनी वि. देशमुख
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org