-डॉ. माधवी वैद्य  madhavivaidya@ymail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाक्प्रचार, म्हणी, सुभाषिते, अलंकार ही आपल्या भाषेची अलंकारलेणी आहेत, ज्यामुळे  मराठी भाषेला सौंदर्य प्राप्त होते. भाषा अधिक अमृतमयी, दळदार पद्धतीने सादर होते. आधीचा मराठी भाषेचा गोडवा हजार पटीनी द्विगुणित होतो.

माझी एक आजी होती. फार शिकलेली वगैरे नव्हती. तिच्याकडे जात्याच्या ओव्या, पारंपरिक गाणी, लग्न समारंभातील गाणी, उखाणे, भातुकली, हादग्याची गाणी, मंगळा गौरीची गाणी, अभंग, गौळणी, ओव्या, म्हणी, वाक्प्रचार यांचा फार मोठा संग्रह होता. आजी वेळ साधून म्हणी आणि वाक्प्रचार इ.चा अचूक उपयोग करायची, तिचे ते रसाळ बोलणे नुसते ऐकत राहावेसे वाटायचे. कधी निसर्ग, कधी समाजकारण, कधी लोकव्यवहारावर टिप्पणी म्हणून या म्हणींचा वापर होत असे. कधी अचूक, मार्मिकतेने जीवनाचे सारच या म्हणींमधून आपल्या समोर मांडले जायचे. खरे तर म्हणी आणि वाक्प्रचार ही आवळी जावळी भावंडे आहेत असे म्हणायला पाहिजे. पण दोन्हीतून मराठी भाषेचे आशयदृष्टय़ा, रूपदृष्टय़ा एक वेगळेच सौंदर्य प्रतीत होते. पण दोहोत एक सूक्ष्म फरक आहे. म्हणींमध्ये आंतरिक लय अनुस्यूत असते. जी कवितेच्या ओळीच्या जवळ जाणारी असते, वाक्प्रचारांचे तसे नसते. म्हण एकाच अर्थापाशी थबकून राहाते, वाक्प्रचार कदाचित समाजप्रवाहाबरोबर, लोक रूढींबरोबर आशयदृष्टय़ा बदलत बदलत, प्रवाही होत होत आपल्यापर्यंत येतात. पण यामुळे भाषेला सौंदर्य, गती, चमत्कृती, एक सुंदर लेहेजा प्राप्त होतो. बहिणाबाई चौधरींसारख्या  प्रतिभावंत आपल्या भाषासामर्थ्यांने नवीन म्हणी निर्माण करतात. वा. गो. आपटे, डॉ. द. ता. भोसले यांसारख्या विद्वानांनी म्हणींवर खूप अभ्यासपूर्ण लेखन केलेले आहे. पण आज भाषेची ही सौंदर्यस्थळे विस्मृतीत जात आहेत. म्हणी, अलंकार, वाक्प्रचार इ.मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकातून समाविष्ट केलेली आहेत. पण भाषेची गोडी लागण्याच्या दृष्टीने इतके पुरेसे नाही. त्यासाठी अधिक जागृततेने काही करणे गरजेचे आहे. नाही तर आपण ही भाषिक श्रीमंती गमावून बसू अशी काळजी वाटते.