नैसर्गिक जंगलांचे फायदे अनेक असतात कारण जैवविविधतेबरोबरच तेथे अनेक प्राणी-पक्ष्यांचा अधिवास असतो. जंगलांमुळे वातावरण बदलाचा प्रभाव कमी होतो, आदिवासींना अन्न सुरक्षा लाभते, विकासकामांसाठी लाकूड मिळते त्याचबरोबर कृषिक्षेत्रास आवश्यक असणारा पाऊसही भरपूर पडतो. या पावसामुळेच सर्व धरणे भरतात आणि आपल्या पाण्याचा प्रश्न सुटतो. असे फायदे मानवनिर्मित जंगल पद्धतीचे आहेत काय, असा प्रश्न साहजिकच आपल्या मनात उभा राहतो.
मियावाकी पद्धतीकडे पाहिल्यास या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी मिळते. अतिशय दाटीवाटीने वाढणाऱ्या या विविध वृक्ष मांदियाळीमधून आपणास सलोखा आणि मैत्रीचे नाते कसे असते याचे उत्कृष्ट शिक्षण मिळते. चार वेगळय़ा आकारांच्या अनेक प्रकारच्या भिन्न कुळांमधील वृक्ष दिलेल्या मर्यादित बंदिस्त जागेत एकमेकांना सहकार्य करून सलोख्याने कसे राहतात, हे तर येथे पाहायला मिळतेच; त्याचबरोबर भारताच्या ग्रामीण भागांत, खेडय़ापाडय़ांत निसर्गाचे हेच प्रारूप पूर्वी कसे रुजले होते, हेसुद्धा अनुभवता येते. मियावाकी पद्धतीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे येथील समृद्ध जैवविविधता. या जंगलात विविध फुलपाखरे, कीटक तर पाहण्यास मिळतातच, पण त्याचबरोबर हा अनेक लहान पक्ष्यांचासुद्धा अधिवास आहे. शहरातील माती आणि गवत हरवल्यामुळे अनेक छोटे पक्षी दिसेनासे झाले आहेत, जे दिसतात ते मोठय़ा शिकारी पक्ष्यांच्या भीतीच्या छायेत जगत असतात. मियावाकी जंगल पद्धती या छोटय़ा पक्ष्यांना सुरक्षित निवारा तर देतेच त्याचबरोबर शाश्वत अन्न पुरवठासुद्धा करते. या तंत्रज्ञानात पारंपरिक देशी वृक्षांची आपणास ओळख तर होतेच त्याचबरोबर त्यांच्या रोपवाटिका निर्मितीमधून शेकडो रोजगार निर्माण होऊ शकतात. या पद्धतीमध्ये भूगर्भातील देशी गांडुळांना पृष्ठभागावर येण्याचे आमंत्रण मिळते त्यामुळे जमीन सच्छिद्र होऊन भूगर्भात पाणी साठवणक्षमता वाढू शकते. मियावाकीमुळे शहरातील हरित क्षेत्र वाढते. या जंगल पद्धतीत वृक्षांचा मृत्यूदर जवळपास शून्य असतो. मियावाकीच्या घनदाट जंगलात मनुष्य प्रवेश वर्ज्य आहे. मात्र तिची निर्मिती करतानाच आतील वृक्षांची ओळख होण्यासाठी यामध्ये पायवाट तयार करता येते. स्थानिक वृक्षांचे संवर्धन, शहराच्या हरित पट्टय़ात वाढ, जैवविविधतेचा सांभाळ, लोकशिक्षणाचे माध्यम, अतिक्रमण थोपवणे हे या पद्धतीचे फायदे आहेत. ही पद्धत पारंपरिक वृक्षारोपणापेक्षा थोडी खर्चीक असते आणि कार्बन स्थिरीकरणात तिचा फारसा सहभाग नसतो, हेसुद्धा लक्षात ठेवावयास हवे.
– डॉ. नागेश टेकाळे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org