योगेश सोमण
युरेनिअमच्या किरणोत्सारी गुणधर्माचा शोधही अपघातानेच लागला. १८९६ साली हेन्री बेक्वेरेलने किरणोत्सारितेचा लावलेला शोध विज्ञान जगतात एक महत्त्वाची घटना ठरली. या शोधानंतर प्रयोगशाळेत कृत्रिमरीत्या मूलद्रव्ये तयार करण्यात वैज्ञानिकांनी यश मिळविले. दीप्तिशील (फ्लुरोसंट) पदार्थात प्रदीप्ती निर्माण होण्याची कारणे शोधण्याचा प्रयत्न हेन्री बेक्वेरेल करीत होते. युरेनिअमच्या संयुगावर प्रयोग करीत असताना, सूर्यप्रकाशात युरेनिअम ठेवले असता ते चमकते असा शोध बेक्वेरेल यांनी लावला. आता सूर्यप्रकाशातून नेमक्या कोणत्या ऊर्जेमुळे युरेनिअम चमकतो, प्रकाश की उष्णता, हा प्रश्न होता. बेक्वेरेल यांनी पुन्हा युरेनिअमच्या संयुगावर प्रयोग केला. या वेळी त्यांनी युरेनिअमचे संयुग एका फोटोग्राफिक प्लेटवर (छायाचित्रण काचेवर) ठेवून ही काच जाड, काळ्या कागदात गुंडाळून सूर्यप्रकाशात ठेवायचे ठरविले. या जाड कागदामुळे सूर्यप्रकाश आत पोहोचणार नव्हता पण सूर्याच्या उष्णतेचा परिणाम होणार होता. थोडा वेळ उन्हात ठेवल्यावर ही काच पुन्हा आणून प्रयोगशाळेत टेबलावर ठेवली. संध्याकाळी या काचेचे निरीक्षण केले असता, ती चमकत होती. थोडय़ा उष्णतेनेही युरेनिअम चमकतो असे बेक्वेरेलच्या लक्षात आले. दोन दिवसांनी पुन्हा हाच प्रयोग करायचे त्याने ठरविले, पण या वेळी मात्र प्रयोगात सूर्याने साथ दिली नाही. ढगाळ वातावरणामुळे, बेक्वेरेलला युरेनिअम ठेवलेली फोटोग्राफिक काच उन्हात ठेवता आली नाही. दोन दिवसानंतर पॅरिसच्या आकाशातील ढग दूर झाले आणि स्वच्छ सूर्यप्रकाश पडला. बेक्वेरेलने युरेनिअमचे संयुग असलेली फोटोग्राफिक काच सूर्यप्रकाशात ठेवण्यासाठी काढली. अचानक बेक्वेरेलने सूर्यप्रकाशात ठेवण्याऐवजी ती फोटोग्राफिक काच धुतली. आणि ती काच पाहून बेक्वेरेल थक्क झाला. टेबलच्या खणात ठेवलेली असूनही त्यावर परिणाम झालेला दिसत होता. यावरून बेक्वेरेलने असा निष्कर्ष काढला की युरेनिअममधून कुठले तरी अदृश्य किरण निघत असावेत. या उत्सर्जनासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता नाही. काही काळानंतर बेक्वेरेलने शुद्ध युरेनिअम वापरून आपला प्रयोग पुन्हा करून पाहिला आणि संयुगापेक्षा शुद्ध युरेनिअमची किरणोत्सारिता अतितीव्र स्वरूपाची असते हे सिद्ध केले. युरेनिअमच्या या गुणधर्माचा सखोल अभ्यास मेरी आणि पिअरी क्युरी यांनी केला. मेरी क्युरीनेच या परिणामाला ‘रेडिओऑक्टिव्हिटी (किरणोत्सार)’ असे नाव दिले. या शोधामुळे भौतिकशास्त्राची एक नवीन शाखाच उदयास आली. मेरी व पिअरी क्युरी यांना हेन्री बेक्वेरेलसह किरणोत्साराच्या शोधासाठी १९०९ चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org