शेतीसाठी वनस्पतींच्या नवीन जाती तयार करण्याचा कोणताही प्रकल्प सुयोग्य आणि आनुवंशिक जैवविविधतेच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. अशी जैवविविधता नसíगक असू शकते किंवा जैवउत्परिवर्तनाचे तंत्र वापरून गॅमा किरण, न्यूट्रॉन आदी विकिरणांद्वारे कृत्रिमरीत्या तयार करता येते. निवडक जैवविविधतेतून जैवउत्परिवर्तन व वनस्पतीपदास तंत्रांच्या एकत्रित वापराद्वारे कृषी वनस्पती पदास शास्त्रज्ञ सुधारित जाती तयार करतात. या नवीन जातींच्या अनेक चाचण्या ‘भारतीय कृषी अनुसंधान परिषद’ आणि कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये घेतल्या जातात. या चाचण्यांतून निवड झालेल्या जातींची नंतर शेतीसाठी शिफारस करण्यात येते.
मुंबई येथील भाभा अणू संशोधन केंद्राने (बीएआरसी) ‘अणुशक्तीचा शांततामय कार्यासाठी उपयोग’ या कार्यक्रमांतर्गत वेगवेगळी विकिरणे वापरून शेतीसाठी सुधारित जाती तयार करण्याचा संशोधन प्रकल्प जवळपास ५० वर्षांपूर्वी सुरू केला. सदर प्रकल्पांतर्गत बीएआरसीने आतापर्यंत ४१ सुधारित जाती तयार केल्या आहेत. त्यांची शेतीसाठी शिफारस करण्यात आलेली आहे. तसेच कृषी मंत्रालय (भारत सरकार) यांच्यातर्फे अधिकृतरीत्या नोंदणी करण्यात आलेली आहे. यांमध्ये २१ तेलबिया (१५ शेंगदाणा, ३ मोहरी, २ सोयाबीन, २ सूर्यफूल), १८ डाळी (८ मूग, ५ उडीद, ४ तूर, १ चवळी), १ भात आणि १ ताग या पिकांच्या जातींचा समावेश होतो. बीएआरसीच्या काही जाती शेतकऱ्यांमध्ये अतिशय लोकप्रिय असून त्यांची देशाच्या अनेक भागांत विस्तृत प्रमाणात लागवड केली जाते. विकिरणे वापरून तयार केलेल्या या जैव उत्परिवर्तीत जातींमुळे राष्ट्रीय कृषी क्षेत्रावर खूप चांगला परिणाम झाला आहे.
याबरोबरच, भाभा अणू संशोधन केंद्राने केळी संशोधन प्रकल्पांतर्गत केळीच्या उतीसंवर्धनाचे तंत्रज्ञान विकसित केले अहे. त्याच्या व्यावसायिक उत्पादनासाठी इतर संस्थांकडे त्याचे हस्तांतरणही करण्यात आलेले आहे.
भाभा अणू संशोधन केंद्राचे नाभिकीय कृषी व जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील भरीव कार्य हे अणुशक्तीच्या शांततामय उपयोगाचे उत्तम उदाहरण आहे.
वॉर अँड पीस – रक्ताचे विकार : भाग – ५
रुग्णालयीन उपचार – १) नाकातून रक्त येणे – गुलाबकळी, बाहवा, मनुका, बाळहिरडा, ज्येष्ठमध प्र. पाच ग्रॅम व सोनामुखीपाने दहा यांचा काढा निकाढा घ्यावा. २) रांजणवाडी – वरीलप्रमाणे चांगला जुलाब होण्याकरिता काढा घ्यावा. रांजणवाडी खूपच मोठी असल्यास कापून काढावी. ३) संडासवाटे रक्त पडणे – ज्येष्ठमध व गेळफळाचा काढा उलटीच्या प्रयोगाकरिता विधीपूर्वक वापरावा. ४) रक्तस्त्राव न थांबणे – अर्जुनसालचूर्ण वाहणाऱ्या जखमेवर दाबून ठेवावे. असे दोन-तीन वेळेला नवनवीन अर्जुनचूर्ण लावावे.
दक्षता – १) कोणत्याही परिस्थितीत पांडुता येणार नाही, यावर सतत लक्ष असावे. २) वमन, विरेचनाचे उपचार करताना रोगी बलवान व तरुण आहे हे कटाक्षाने पहावे. ३) रक्तस्त्राव थांबत नसल्यास, विनाविलंब रुग्णालयात प्रवेशित करावे व जीवन रक्षणाकरिता तातडीचे उपचार करून घ्यावेत.
आमचे वडील कै. यशवंत हरी वैद्य यांनी त्यांच्या वैद्यकीय व्यवसायात, अनेकानेक औषधी प्रयोग केले. रुग्णाला घरी काढे करायला लावणे, हा त्यांचा चिकित्सेतील एक आग्रही भाग असे. कायाकल्प काढा, खोकला काढा, मधुमेह काढा, सातापाकाढा, पित्तशुद्धीकाढा या अनेक काढय़ाप्रमाणेच रक्तशुद्धी काढा पुडय़ा दर आठवडय़ाला दहा वीस रुग्णांना तरी ते देत असत.
रक्ती मूळव्याध, उष्णतेचे विकार, रक्तदृष्टी, रक्तातील उष्णता वाढून महारोगासारखी लक्षणे वाटणे, पांडुता, सर्वागदाह, विविध कुष्ठ विकार अशाकरिता पुढील औषधांचा ‘रक्तशुद्धी काढा’ आमच्या वापरात आहे. उपळसरी, वाकेरी, मंजिष्ठ, लाजाळू, सप्तकपी, जिरे, आवळा, लोध्र, चंदन, रक्तचंदन, मनुका, नागरमोथा, कडुलिंब, ज्येष्ठमध, धायटी, अडुळसा, गुळवेल, धमासा, कुटकी, धने, हळद, दारु हळद, गोखरू, अर्जुन, शतावरी प्र. ३ ग्रॅम, पाणी ८ कप घेऊन उकळून आटवून काढा अर्धाकप सकाळी घेणे. सायंकाळी ४ कप पाणी घालून आटवून अर्धा कप काढा घेणे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ११ जून
१९२४> नाना फडणिसांचे चरित्र, हरिवंशाची बखर, इचलकरंजी संस्थानचा इतिहास आदींचे लेखक, इतिहासकार वासुदेवशास्त्री खरे यांचे निधन. त्यांनी दोन नाटके लिहिली व ‘यशवंतराय’ या खंडकाव्यासह काही पद्यरचनाही केल्या.
१९२९> ‘अनंततनय’ नावाने काव्यलेखन करणारे दत्तात्रेय अनंत आपटे यांचे निधन. ‘श्री महाराष्ट्र शारदामंदिर’ या कवींसाठी स्थापन झालेल्या संस्थेचे ते आधारस्तंभ होते. ‘हृदयतरंग (भाग १ ते ३), पद्यदल आणि ‘श्रीमत तिलक-विजय’ हे लो. टिळकांचे ओवीबद्ध चरित्र आदी काव्यपुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
१९४२ > मराठीतील महत्त्वाचे आधुनिक, प्रयोगशील कवी, लेखक आणि अभ्यासू समीक्षक विलास सारंग यांचा जन्म. ‘सिसिफस आणि बेलाक्वा’, ‘अक्षरांचा श्रम केला’ आदी समीक्षालेखन, ‘सर्जनशोध आणि लिहिता लेखक’,‘अमर्याद आहे बुद्ध’ सारखे अभ्यासू चिंतन, ‘रुद्र’, (कादंबरी), तसेच ‘मॅनहोलमधला माणूस’, ‘सोलेदाद’ आदी अनेक पुस्तके मराठीत, तर दिल्लीतील तंदूर-कांडावरल्या ‘तंदूर सिंडर्स’ या इंग्रजी कादंबरीसह अनेक इंग्रजी (ललित व समीक्षापर) पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. प्रकृती साथ देत नसताना, आजही ते लिहिते आहेत!
– संजय वझरेकर
जे देखे रवी.. – रहस्यकथा भाग- ५ आणि शेवट : न्याय?
त्या खटल्याचा निकाल माझ्याविरोधात गेला. मला २४ हजार रुपये रकमेचा दंड करण्यात आला. निकालात माझ्या भावाची साक्ष तो माझा नातेवाईक म्हणून फेटाळली आणि मी चोवीस तास पुण्याला गेलो, ही बाब फार गंभीरपणे घेतली होती. तिने तपासणीस नकार दिला किंवा ‘Maharashtra Medical Council’ ने मला निर्दोष ठरवले होते, हे मुद्दे ग्राह्य धरले नव्हते. मग मी व माझ्या वकिलाने राज्यस्तरीय ग्राहक मंचाकडे जायचे ठरवले. दंड भरण्याचा प्रश्न आला तेव्हा आम्ही तो कोर्टात भरू, असे आम्ही म्हटले पण कोर्टाने अजून असे खातेच काढले नव्हते. एकदा हिला पैसे दिले की ते गेल्यातच जमा होणार होते. राज्यस्तरीय मंचाकडे हा मुद्दा लावून धरण्यात आला. आमचा कज्जा लवकर घ्या, असा युक्तिवाद केल्यावर हा कज्जा लगेचच उभा राहिला.
बयाबाई आल्या होत्या. माझी केस लवकर घ्या असे न्यायाधीशाला विनवू लागल्या. न्यायाधीश म्हणाले, ‘‘कोर्टात एवढे सारे पुरुष आहेत मामला नाजूक आहे जरा सबूर कर.’’ ही ऐकेना तेव्हा न्यायाधीशाने माघार घेतली आणि माझ्या वकिलाने मला जे सांगितले त्याप्रमाणे पाच-दहा मिनिटांतच ‘हलगर्जीपणा सिद्ध नाही आणि हा दंड योग्य नव्हे,’ असा निर्णय दिला.अनेक महिने चाललेले हे अतित्रासदायक प्रकरण एकदमच निपटले गेले.
मी जिंकलो आणि हरलोसुद्धा. या वैद्यकीय मामल्यात या बाईला माझ्यामुळे काही अपाय खरोखरच झाला की कसे हे केवळ तिच्या हट्टामुळे सिद्ध किंवा असिद्ध झाले नाही. मला पहिल्यांदा दोषी ठरवले गेले, मग निर्दोष म्हणून जाहीर झाले.
या साऱ्या प्रकरणात मला त्या बाईचा एकदाही राग आला नाही. मात्र तिने स्वत:चे आणि माझे तत्कालीन आयुष्य ढवळून काढले हे नक्की. नवऱ्याला न सांगता फॅशन म्हणून ही बाई साहस करायला गेली आणि मूर्खासारखा मी त्यात ओढला गेलो. त्यातच रुग्णालयात संप झाला. माझे वडील आजारी पडले. काही काही गोष्टी अशा काही घडतात की मती गुंग होते. म्हणूनच मी याला रहस्यकथा म्हटले.
पुढे एक परिसंवाद झाला. त्यात सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश पेंडसे यांनी वैद्यकीय बाबतीत आरोप मांडण्याआधी मामल्याची प्राथमिक तपासणी वैद्यकीय मंडळींनी केली पाहिजे, अशी सूचना केली. तसे हल्ली करतात असे ऐकले. त्या काळात ही बाई फोन करून त्रास देत असे. त्याच काळात मी एक फार लढा देत होतो. त्याला मी कधी घाबरलो नाही, पण ही पडली बाई. महाभारतात भीष्मासमोर शिखंडीला उभी केली होती तशी. पण त्याच काळात ‘बोरीबंदरची म्हातारी’ म्हणवल्या जाणाऱ्या एका इंग्रजी वर्तमानपत्रात माझ्यावरच्या खटल्याची चार कॉलमी बातमी छापून आली त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com