आग्रा येथून ५७ कि.मी.वर पश्चिमेस, सध्या राजस्थानात जिल्ह्याचे ठिकाण असलेले भरतपूर हे ब्रिटिशराजमध्ये एक महत्त्वाचे संस्थान होते. ५१०० चौ.कि.मी. राज्यक्षेत्र असलेल्या भरतपूर संस्थानास ब्रिटिशांनी १७ तोफांच्या सलामीचा मान दिला.
सतराव्या शतकात राजाराम, चुडामण व बदनसिंह यांनी या प्रदेशातल्या जाटांची एकी, समन्वय साधून छोटे राज्य स्थापन केले. चुडामण याच्या कारकीर्दीत १७१५ साली मोगल बादशाहने त्याला मनसबदार हा खिताब देऊन मालाह, रूपवास, आघापूर, भरतपूर ही गावे इनाम दिली. १७२४ साली चुडामणने डीग येथे राजधानी केली. पुढे १७५६ मध्ये राजेपदावर आलेल्या सूरजमल जाट याने भरतपूर येथे आपली राजधानी हलवून गावाभोवती भला भक्कम कोट बांधला. सूरजमलने राज्याच्या सीमा आग्रा, धोलपूर, मनपुरी, अलीगढ, मेरठ, इटावा, मथुरा घेऊन विस्तीर्ण केल्या, लोहगड हा मजबूत किल्ला बांधला. १७५४ साली मराठय़ांनी सूरजमलच्या कुम्हेर किल्ल्याला सहा महिने वेढा घातला. त्यांना किल्ला घेता आला नाही पण चकमकीत खंडेराव होळकर मारला गेला.
मथुरेच्या नबी मशिदीवरून सदाशिवराव भाऊ आणि सूरजमल यांच्यात वाद होता. पुढे दिल्लीतील लाल किल्ल्याच्या दिवाण-ए-खासच्या छतातील सोने विकून मराठा फौजेचे वेतन देण्यालाही सूरजमलने हरकत घेतली. १७६१ साली झालेल्या पानिपतयुद्धानंतर त्यातून वाचलेले ३० ते ४० हजार जखमी सनिक आणि बुणगे महाराष्ट्रात परत येत असताना त्यांच्याकडे अन्न, पाणी, कपडे नव्हते, थंडीचे दिवस होते. वाटेवरील भरतपूरमध्ये सूरजमलने त्यांना अन्नपाणी, औषधोपचार, पांघरुणे देऊन त्यांची सोय केली आणि परतणाऱ्या प्रत्येकाला एक रुपया व एक शेर धान्य दिले. १७६३ साली नवाब नजीउद्दौलाशी झालेल्या लढाईत सूरजमलचा मृत्यू झाला. अत्यंत दूरदर्शी, बुद्धिवान आणि स्थिर विचारांचा राजा म्हणून सूरजमलची ओळख होती. महाराजा ब्रिजेंद्रसिंह या शेवटच्या शासकाने भरतपूर संस्थान १९४७ साली स्वतंत्र भारतात विलीन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा