भानू काळे

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बँकेत गर्दी असली तर कधी कधी बँकेतील बाकावर काही मिनिटे बसून राहावे लागते आणि असा प्रसंग बऱ्याचदा येतो. शब्दांच्या व्युत्पत्तीच्या दृष्टीनेदेखील बँक आणि बाक (ऊर्फ ‘बेंच’) यांचा घनिष्ठ संबंध आहे!

हे दोन्ही शब्द ‘बांका’ (banca) या लॅटिन शब्दावरून आले आहेत. प्राचीन इटलीमध्ये गावोगावी आठवडय़ाचे बाजार भरत. एका बाजूला आपापली बाके टाकून सावकार बसत. मालाच्या खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना जुने कर्ज चुकते करणे किंवा नवे घेणे वगैरे व्यवहार तिथेच चालत. प्रत्येक सावकाराचे बसायचे बाक ठरलेले असे. तो सावकार त्या बाकावरूनच ओळखला जाई. त्यावरून कालांतराने त्या विशिष्ट बाकाला व सावकाराला लॅटिनमध्ये ‘बांका’ आणि पुढेपुढे इंग्रजीत ‘बँक’ म्हणायला सुरुवात झाली. जेवढे सावकार तेवढी बाके आणि तेवढय़ाच बँका असत.

आधुनिक अर्थव्यवस्थेत सरकारतर्फे ‘बजेट’ सादर केले जाते. ‘जमाखर्चाचा अंदाज’ या अर्थाने ‘बजेट’ शब्द सगळय़ाच भाषांत रूढ झाला आहे. सामान्य माणसेही आपापले बजेट करतच असतात. ‘मी तो फोन घेतला नाही, कारण माझ्या बजेटमध्ये तो बसणारा नव्हता,’ असे आपण खूपदा म्हणतो. सरकारतर्फे सादर होणाऱ्या बजेटची चर्चा वृत्तपत्रांतून बरेच दिवस चालू असते. पण प्रत्यक्षात ‘बजेट’ शब्दाचा जमा किंवा खर्च यांच्याशी काडीचाही संबंध नाही. ‘बजेट’ हा शब्द ‘बोगेटे’ (bougettes) म्हणजे ‘कातडय़ाची लहान पिशवी’ या अर्थाच्या लॅटिन शब्दावरून आला आहे.

मूळ लॅटिन शब्द ‘बोगे’ (ऊर्फ बॅग किंवा पिशवी) आणि त्याचे छोटे रूप म्हणजे ‘बोगेटे’. गंमत म्हणजे आज ‘बोगेटे’ हा बायकांच्या पर्सचा खूप महागडा इटालियन ब्रँड आहे! पूर्वी व्यापारी आपले पैसे किंवा हिशेबाचे महत्त्वाचे कागद ‘बोगेटे’ नावाच्या छोटय़ा कातडी पिशवीत ठेवत. पुढे कायदेमंडळांत अंदाजपत्रक सादर करायची प्रथा सुरू झाली, तेव्हा संबंधित मंत्री अंदाजपत्रकाचे कागद अशाच छोटय़ा कातडी पिशवीत घालून आणत. ‘बोगेटे’चे रूप बोलीभाषेत ‘बोजेट’ आणि नंतर ‘बजेट’ असे झाले. ‘ॠ’चा उच्चार ‘ग’ऐवजी ‘ज’ असाच व्हावा म्हणून त्याचे स्पेलिंगदेखील budget असेच केले गेले. आजही जगभरचे अर्थमंत्री कातडी पिशवीत घालूनच बजेटचे कागद सभागृहात आणतात आणि ‘काय काय दडले आहे त्या पिशवीत’ याची चर्चा सुरू होते!

मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhashasitra bank budget market loan in the modern economy ysh