डॉ. माधवी वैद्य
खरे तर अरविंदकुमारांना आता आपल्याला नोकरीत बढती मिळू शकते अशी जेव्हा कुणकुण लागली तेव्हापासूनच त्यांना अधिकारी म्हणून खुर्चीवर बसण्याची घाई झाली होती. खरे तर ती बढती मिळण्याचा काळ अजून दूर होता. त्याची स्वप्ने आत्ताच बघणे म्हणजे गुडघ्याला बाशिंग बांधण्यासारखेच होते. कोणत्याही व्यक्तीला योग्य वेळी योग्य ती स्वप्ने पडणे आणि त्या व्यक्तीनेही ती योग्य वेळीच बघणे हे अतिशय महत्त्वाचे असते. पण अरविंदकुमार यांना तेवढी कुठली सवड असायला? त्यातून त्यांना आपल्या आधी कोणी दुसराच अधिकारी ती जागा बळकावून तर नाही बसणार ना, अशी भीतीही वाटत होती. मग त्यांनी आपणच कसे या जागेसाठी योग्य आहोत आणि इतर कोणी तिथे अधिकारी म्हणून येणे कसे अनुचित आहे, अशी तजवीज करण्याचे अनंत घाट घातले. अती घाई संकटात नेते हे त्यांना बहुधा माहीत नसावे.
त्यांचा एक मित्र हे सर्व लांबून बघत होता. त्यावर तो आपल्या एका दुसऱ्या मित्राला म्हणाला, अरे! म्हशीच्या दुधाच्या धारा अजून काढायच्या आहेत, ती किती दूध देणार याचा काहीच अंदाज नाही. त्या दुधाचे नेमके काय करायचे ते अजून ठरलेले नाही. दुधाचे दही लावायचे का नाही तेही अजून ठरलेले नाही. ताक घुसळायला अजून खूप अवकाश आहे. तरीही दारी बांधलेली म्हैस आणि ताक यावरून आत्ताच भांडणाला सुरुवात करायची? काय हा घायाकुता स्वभाव ! याच अर्थाची आणखी एक म्हण आहे ती म्हणजे ‘बाजारात तुरी आणि धनी धनिणीला मारी.’ बाजारातल्या तुरी अजून घरी आलेल्या नाहीत पण त्या तुरीचे सारे वरण मात्र मीच खाणार, असे म्हणणाऱ्या भ्रतारासारखे हे झाले. नाही का? या म्हणीचा भावार्थ असा की अजून अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टीवर हक्क दाखवत विनाकारणच तंटा बखेडा उभा करणे.