भानू काळे
रॉबर्ट क्लाइव्हने १७५७ मध्ये प्लासीची लढाई जिंकली आणि तेव्हापासून १९४७ सालापर्यंत इथे राज्य केले. इतक्या प्रदीर्घ काळात इंग्रजी भाषेचे अनेक संस्कार मराठीवर होणे स्वाभाविकच होते. कधी ते इंग्रजी शब्द आपण जसेच्या तसे मराठीत समाविष्ट केले. जसे की, पोस्टर, कॅमेरा, फर्निचर, रजिस्टर, फाइल, टेप, पोस्टमन, मनीऑर्डर, पोस्टकार्ड, पोस्ट मास्टर, स्कूटर, टायर, ब्रेक, कार, गॅरेज, बेसिन, पाइप, प्लेट, स्टँड, सिग्नल, कंपनी. कधी अगदी किरकोळ बदल करून आपण ते शब्द आपलेसे केले. जसे की, पाकीट, तिकीट, पलटण, कप्तान, मास्तर, बाटली.
या सदरात पूर्वी लिहिल्याप्रमाणे सावरकरांसारख्या प्रतिभावंतांनी अनेक इंग्रजी शब्दांना उत्तम प्रतिशब्दही शोधले. त्यानंतरही अनेक इंग्रजी शब्दांना आपण चपखल मराठी पेहराव चढवला. उदाहरणार्थ, ‘हायब्राऊ’चेआपण ‘उच्चभ्रू’ केले. ‘गोल्डन चान्स’ ‘सुवर्णसंधी’ बनला. ‘गोल्ड बॉन्ड’ ‘सुवर्णरोखे’ बनले. ‘ब्लॅक मनी’ ‘काळा पैसा’ बनला. ‘रेकॉर्ड ब्रेक’चे ‘उच्चांक मोडणे’ झाले. ‘व्हाईट पेपर’ हा सरकारी अहवाल ‘श्वेतपत्रिका’ बनला.
सत्य सामान्यत: दोन परस्परविरोधी मतांच्या मध्यावर कुठेतरी असते आणि तो मध्य गाठून आपले विचार संतुलित ठेवावेत, हा ‘ब्रिटिश जंटलमन’चा एक पारंपरिक आदर्श. त्याला त्यांनी ‘गोल्डन मीन’ म्हटले. आपण त्याची पार्श्वभूमी फारशी विचारात न घेता त्यासाठी ‘सुवर्णमध्य’ हा शब्द शोधला. ‘एअर होस्टेस’ला हवाईसुंदरी, ‘स्कायस्क्रॅपर’ला गगनचुंबी, ‘वॉलंटरी रिटायरमेंट’ला स्वेच्छानिवृत्ती, ‘वर्ल्ड कप’ला विश्वचषक म्हटले. हे सर्व मराठीकरण संस्कृतच्या आधारेच झालेले आहे.
संस्कृतची नवशब्दप्रसवक्षमताही किती विलक्षण आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे रेडियोसाठी ‘आकाशवाणी’ किंवा टीव्हीसाठी ‘दूरचित्रवाणी’ हा शब्द. स्वयंपूर्णता हे भाषिक सामर्थ्यांचे एक द्योतक आहे; पण परकीय शब्द पचवण्याची, आत्मसात करण्याची क्षमता हेही भाषिक सामर्थ्यांचे द्योतक आहे. कारण कुठलीच भाषा अन्य भाषांपासून पूर्णत: अलिप्त राहू शकत नाही. सुदैवाने अनेक परकीय प्रवाहांना स्वत:मध्ये सामावून घेत पुढे जात राहणे, वर्धिष्णू होत जाणे हे भारतीय संस्कृतीचे एक ठळक वैशिष्टय़ आहे. भाषेच्या संदर्भात ते प्रकर्षांने जाणवते.