संस्कृत भाषेची नवशब्दप्रसवक्षमता किती विलक्षण आहे याचे उत्तम उदाहरण म्हणजे रेडियोसाठी प्रतिशब्द म्हणून देशभर वापरला जाणारा ‘आकाशवाणी’ हा शब्द. रेडियोचा शोध मार्कोनी या इटालियन संशोधकाने साधारण १९०० सालाच्या सुमारास लावला. प्रकाशाचा किरण किंवा झोत वा लहरी या अर्थाच्या ‘रेडियस’ या लॅटिन शब्दावरून मार्कोनीने रेडियो हा शब्द घडवला. तेव्हापासून जगभर तोच शब्द रूढ होता.
भारतात १९२३ साली रेडियोचे प्रसारण सुरू झाले तेव्हाही त्याला रेडियोच म्हणत. म्हैसूरमधील एम. व्ही. गोपालस्वामी या मानसशास्त्राच्या प्राध्यापकांनी आपल्या ‘विठ्ठल विहार’ बंगल्यात १९३६ साली खासगी रेडियो स्टेशन सुरू केले, त्याला ‘आकाशवाणी’ हे नाव दिले. आकाशातून माणसाला संदेश मिळतात हा आपल्या सांस्कृतिक संचिताचाच भाग आहे. त्यातूनच ‘आकाशवाणी होणे’ ही संकल्पना निघाली. उदाहरणार्थ, देवकीचा आठवा पुत्र आपला वध करेल हे आकाशवाणी होऊनच कंसाला कळले होते. तो पारंपरिक शब्द रेडियोसाठी उत्तम प्रतिशब्द होता. लवकरच आकाशवाणी हे लोकांपर्यंत पोचायचे सर्वात प्रभावी साधन बनले. वृत्तपत्रे वाचण्यासाठी आवश्यक ती साक्षरता आपल्या देशात कमीच होती आणि दूरदर्शनच तेव्हा दूरच होते. साहजिकच केंद्र सरकारने हे महत्त्वाचे जनसंपर्क माध्यम स्वत:च्या ताब्यात घेतले. राष्ट्रपती किंवा पंतप्रधान राष्ट्राला उद्देशून भाषण तेथूनच करत. सर्व महत्त्वाच्या घोषणांसाठी आकाशवाणी अपरिहार्य होती. आकाशवाणी केंद्राचा त्याकाळी प्रचंड रुबाब असे व तिथे कायम कडेकोट पोलीस बंदोबस्त असे. पण त्यावेळीही सरकारी स्तरावर ‘ऑल इंडिया रेडियो’ हेच शब्द रूढ होते.
मूळ पुण्याचे बाळकृष्ण विश्वनाथ केसकर हे पुढे १९५२ ते १९६२ अशी सलग १० वर्षे केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री होते. ते काशीला प्राध्यापक होते व भारतीय संस्कृतीचा त्यांचा मोठा व्यासंग होता. त्यांच्याच पुढाकाराने १९५७ साली ‘आकाशवाणी’ हा शब्द रेडियोसाठी अधिकृतरीत्या वापरला जाऊ लागला. भारतात १९५९ साली टेलिव्हिजन प्राथमिक स्वरूपात सुरू झाले आणि त्यासाठीही पुढे ‘दूरदर्शन’ हा चपखल संस्कृतजन्य प्रतिशब्द योजला गेला. संस्कृतच्या नवशब्दप्रसवक्षमतेचे ते आणखी एक द्योतक.
भानू काळे