डॉ. नीलिमा गुंडी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आपल्या आतबाहेर वास करणारी भाषा आपल्या अभिव्यक्तीसाठी जशी मदत करते, तशीच आपल्याला जगात वावरण्यासाठी व्यवहारबोधही करते. उदाहरणार्थ ‘जसा चारा तशा धारा’ हा वाक्प्रचार म्हणजे एक सूत्रच आहे. आपण गुरांना ज्या योग्यतेचा चारा देऊ, त्या योग्यतेनुसार दुधाच्या धारा आपल्याला मिळणार, हा त्याचा अर्थ आहे. ‘पेरिले ते उगवते’ यातही हाच अर्थ अभिप्रेत आहे.

व्यवहारात सुष्ट-दुष्ट अशा दोन्ही प्रवृत्ती अस्तित्वात असतात. अशावेळी नुसते आदर्शवादी तत्त्वज्ञान उपयोगी पडत नाही. त्यामुळे,‘काटय़ाने काटा काढावा’, असा वाक्प्रचार वैचारिक आयुध पुरवणारा वाटतो. एखाद्या अप्रिय व्यक्ती/ वस्तूचा त्रास दुसऱ्या अप्रिय व्यक्ती/वस्तूकडून नाहीसा करून घेण्याविषयीचा हा उपदेश ‘पंचतंत्र’ या प्राचीन ग्रंथातील आहे, हे नमूद करायला हवे.

काही वाक्प्रचार जीवनातील कटू सत्ये प्रकाशात आणून आपल्याला सावध करतात. ‘भिंतीला कान असतात’ (आपली गुप्त गोष्ट कोणास ऐकू जाईल, याचा नेम नसतो). ‘देखल्या देवा दंडवत’ (काही लोक निष्ठापूर्वक नव्हे, तर उपचार म्हणून चांगले वागतात). असे अनेक वाक्प्रचार शालेय जीवनापासून आपल्याला व्यवहाराला तोंड देण्यासाठी वैचारिक शिदोरी पुरवतात.

काही वाक्प्रचार आपल्याला विपरीत परिस्थितीतही आशावादी राहण्याचा मंत्र देतात .उदा. ‘प्याद्याचा फर्जी होणे’ हा वाक्प्रचार बुद्धिबळ या खेळातील परिभाषा वापरून तयार झाला आहे. बुद्धिबळाच्या पटावरचे प्यादे हे अत्यंत कमी योग्यतेचे असते. फर्जी (मूळ फारसी शब्द फर्झी) म्हणजे राजाचा वजीर होय. एखादे प्यादे जर आपल्या समोरच्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचले, तर त्याचा फर्जी होतो. म्हणजे अत्यंत सामान्य मनुष्यदेखील यशस्वी वाटचाल करून मोठी योग्यता प्राप्त करू शकतो. हा वाक्प्रचार प्रेरणादायी आहे. काही चरित्रे याची प्रचिती देतात. ‘रंकाचा राव होणे’ (गरीब माणूस श्रीमंत होणे) हा वाक्प्रचारही रूढ आहे. आपल्याला जीवनातील आकस्मिकता, तसेच परिवर्तनशीलता याची जाणीव त्यातून होते. एकंदरीत वाक्प्रचारांमध्ये सामावलेले असे कानमंत्र म्हणजे आपल्या परंपरागत भाषाव्यवहारातील सामूहिक प्रज्ञेचा स्फटिकरूप आविष्कारच ठरतात!