डॉ. नीलिमा गुंडी
वेगवेगळय़ा प्रसंगी काम संपून निरोप घ्यायची वेळ कधीतरी येते. त्यासाठी भाषेत त्या त्या प्रसंगाला अनुसरून वेगवेगळे वाक्प्रचार रूढ आहेत. उदा. ‘समारोप करणे’ हा वाक्प्रचार पाहा. सार्वजनिक समारंभात कार्यक्रम संपताना अध्यक्ष समारोप करतात, अशी प्रथा आहे. (या वाक्प्रचारामागेही मुळात एक विधी जोडलेला होता.) व्रत आदी धार्मिक कार्य असेल, तर ‘सांगता करणे’ असा वाक्प्रचार वापरतात.
लग्नसमाप्तीच्या एका विधीशी निगडित ‘सूप वाजणे’ हा वाक्प्रचार इतर प्रसंगीदेखील लक्षणेने वापरला जातो. त्याचा लक्ष्यार्थ आहे, मोठे कार्य निर्विघ्नपणे संपणे. अनेक दिवस चालणाऱ्या व्याख्यानमाला, संमेलने इत्यादी कार्यक्रमांबाबत हा वाक्प्रचार अगदी शोभून दिसतो. ‘रामराम घेणे/ ठोकणे’, हा वाक्प्रचारही निरोपासाठी वापरला जातो. ‘आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा रामराम घ्यावा’ असे संत तुकाराम यांनी अभंगात म्हणून ठेवले आहे.
वर्तमानपत्रात एखाद्या विषयावर वादविवाद चालू होतो. त्यावर पत्र-व्यवहाराद्वारे होणारी चर्चा फार काळ रेंगाळत राहिली की संपादक हस्तक्षेप करून म्हणतात : ‘आता आम्ही या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.’ येथे वाक्य संपताना येणारे ‘पूर्णविराम’ हे व्याकरणातील विरामचिन्ह लक्षणेने वापरून वैशिष्टय़पूर्ण वाक्प्रचार रूढ झालेला दिसतो.
‘भरतवाक्य’ हा शब्दप्रयोगही वाक्प्रचारासारखा वापरला जातो. पूर्वी नाटक संपण्याच्या वेळी ‘भरतवाक्य’ म्हटले जात असे. नाटकातील नायकाच्या तोंडून ते सर्वाच्या कानी पडत असे. त्यात सर्वाना सौख्य लाभावे, अशी इच्छा व्यक्त केलेली असे. हा एक चांगला रिवाज होता. आजही भाषाव्यवहारात याचा वापर कधीतरी होत असतो.
छत्रपती शिवाजी महाराज पत्र संपवताना ‘मर्यादेयं विराजते’, ही लेखन-समाप्तीची मुद्रा वापरत असत. ऐतिहासिक पत्रे वाचताना ही भाषिक लकब लक्षात राहते. त्यातील शब्दांचा अर्थ असा होतो की येथे थांबणे शोभून दिसते. खरे तर, केवळ पत्रामध्ये नव्हे, तर एकूणच सर्व व्यवहारांत, कोठे आणि कधी थांबावे, हे आपले आपल्याला कळणे फार महत्त्वाचे असते. जगण्याचा कस कायम राखण्यासाठी ते भान आवश्यक असते.