भानू काळे
महात्मा गांधी डिसेंबर १९०४ मध्ये दक्षिण आफ्रिकेत असताना जॉन रस्किन या इंग्रज विचारवंताने १८६० साली लिहिलेला ‘अनटू धिस लास्ट’ हा निबंध त्यांच्या वाचनात आला आणि त्याने ते पुरते झपाटले गेले. त्या निबंधाचा त्यांनी गुजरातीत अनुवाद केला आणि आपल्या ‘इंडियन ओपिनियन’ या आश्रमातून निघणाऱ्या साप्ताहिकात प्रसिद्धही केला. अनुवादाच्या शीर्षकासाठी त्यांनी ‘सर्वोदय’ हा नवाच शब्द योजला. पुढे भारतात परतल्यावर गांधीजींनी त्याच विचारांचा पाठपुरावा विनोबा आणि जयप्रकाश नारायण यांच्या साथीने सुरू केला आणि त्या चळवळीला ‘सर्वोदय’ हेच नाव मिळाले.
त्याच सुमारास हेन्री डेविड थोरो या अमेरिकन विचारवंताचा ‘सिव्हिल डिसओबिडियन्स’ हा १८४९ साली लिहिलेला निबंध गांधीजींच्या वाचनात आला. ‘अन्याय्य कायद्याच्या विरोधात शांततामय मार्गाने निदर्शकांनी एकत्र येणे’ किंवा ‘सविनय कायदेभंग’ ही त्यामागची मूळ संकल्पना. आपल्या चळवळीसाठी हे स्वरूप अगदी योग्य आहे हे गांधीजींच्या लक्षात आले पण त्यासाठी योग्य भारतीय प्रतिशब्द मात्र त्यांना सुचेना. शेवटी आपल्या ‘इंडियन ओपिनियन’मधून त्यांनी वाचकांसाठी ‘सिव्हिल डिसओबिडियन्स’साठी प्रतिशब्द सुचवायची स्पर्धा जाहीर केली, निवडलेल्या शब्दासाठी पारितोषिकही जाहीर केले. मगनलाल गांधी या त्यांच्याच पुतण्याने सुचवलेला ‘सदाग्रह’ (चांगल्यासाठीच आग्रह) हा प्रतिशब्द पारितोषिकप्राप्त ठरला. पण स्वत: गांधीजींना तो तितकासा पसंत नव्हता. शेवटी त्यातच किंचित बदल करून त्यांनी ‘सत्याग्रह’ हा शब्द योजला. ‘सर्वोदय’ आणि ‘सत्याग्रह’ हे गांधीजींनी प्रचलित केलेले दोन्ही शब्द पुढे सर्वच भारतीय भाषांनी स्वीकारले. हे केवळ दोन नवे शब्द नव्हते, तर त्यातून एक विशिष्ट जीवनविषयक तत्त्वज्ञान मांडले गेले होते.
महात्मा गांधींना आजपर्यंत नोबेल पुरस्काराने सन्मानित का करण्यात आलं नाही?
स्वराज्य संघाच्या (अॅनी बेझंट यांनी सुरू केलेल्या ‘होमरूल लीग’ चळवळीच्या) प्रचारार्थ १९१६ सालानंतर लोकमान्य टिळकांनी देशभर दौरे केले. स्वातंत्र्यलढय़ातील तो एक महत्त्वाचा टप्पा होता. त्यावेळी आपल्या भाषणांत सरकारी नोकरांवर टिळक जोरदार टीका करत. सरकारी नोकरांसाठी त्यावेळी ‘ब्युरोक्रसी’ हाच इंग्रजी शब्द मराठीतही रूढ होता. त्याला पर्याय म्हणून ‘नोकरशाही’ हा शब्द टिळकांना सुचला. वऱ्हाड प्रांताच्या दौऱ्यावर असताना अकोट येथील एका भाषणात टिळकांनी ‘नोकरशाही’ हा शब्द प्रथम वापरला आणि पुढे तो सर्वानीच स्वीकारला.