डॉ. माधवी वैद्य
धर्माशेठांची गडगंज इस्टेट. म्हणजे आपली किती संपत्ती आहे, याची मोजदाद त्यांना तरी असेल की नाही कोणास ठाऊक. त्यांचे राहणेही परदेशातच. मूळ गावी त्यांचा खूप मोठा वाडा. पण तिथे ना कोणी राहत असे, ना कोणी येत असे. म्हणजे गावात जसे जुने देऊळ असते ना, तशी त्या वाडय़ाची अवस्था! देऊळ सुस्थितीत असेल तरच तिथे पूजाअर्चा होते, चार लोक जमतात. पण देऊळ जर भक्कम नसेल तर तिथे फक्त कावळेच जमतात. तशातली त्यांच्या त्या प्रशस्त वाडय़ाची गत!
त्या वाडय़ाचा राखणदारही म्हातारा होत चालला होता. एक दिवस त्या राखणदाराने आपल्या धन्याची आठवण काढत काढतच प्राण सोडला. आता त्या वाडय़ाची अवस्था भग्न मंदिरासारखी झाली. वास्तूची देखरेख राहिली नाही की त्याची अवस्था भूतवाडय़ासारखी होते. पण धर्माशेठला त्याविषयी ना खेद ना खंत, अशी स्थिती होती. मग काय गावातल्या काही टोळभैरवांनी परिस्थितीचा भरपूर फायदा घेतला. तिथे अनेक प्रकारचे नको ते व्यवसाय सुरू झाले. गावातल्या रिकामटेकडय़ा लोकांसाठी मजा करण्याचे ते एक हक्काचे ठिकाण होऊन बसले. गावातले जुनेजाणते लोक धर्माशेठच्या वाडय़ाची ही अवस्था बघून खूप हळहळत होते. त्यांच्यापैकी काहींनी धर्माशेठना कळवण्याचा प्रयत्न केलाही. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.
काही दिवसांतच त्या लोकांनी त्या वाडय़ाचा पूर्ण कब्जा घेतला. पण नको त्या उद्योगांना आणि नको त्या माणसांना अटकाव करण्यात गावातली बुजुर्ग मंडळीही यशस्वी झाली नाहीत. सर्व लोक हवालदिल झाले होते. पूर्वी जो वाडा सुसंस्कृत लोकांच्या भेटण्याचा एक ‘सांस्कृतिक कट्टा’ गणला जात होता, तो आता टोळभैरवांच्या कुकर्माचा अड्डा म्हणून गणला जाऊ लागला होता. हे सर्व बघून, गावची एक बुजुर्ग व्यक्ती इतकेच म्हणाली, ‘‘काय बोलायचे? बोलण्यासारखे आता काही उरलेच नाही. ‘रिकाम्या देवळावर कावळय़ांची वस्ती’ झाली आहे झालं.’’